मुंबई: मुंबई महानगरपालिका निवडणुकीत यंदा राजकीय इतिहासात नवे पर्व लिहिले गेले असून, तब्बल अनेक दशकांनंतर भारतीय जनता पक्षाने शिवसेना (एकनाथ शिंदे गट) यांच्या सोबत मिळून सत्तेची चावी आपल्या हाती घेतली आहे. भाजप आणि शिंदे गट महायुतीने स्पष्ट बहुमत मिळवत मुंबई महापालिकेवर वर्चस्व प्रस्थापित केले असले, तरी सत्ता स्थापनेनंतर आता खरा वाद महापौरपदाच्या वाटपावरून निर्माण झाला आहे. विशेषतः अडीच-अडीच वर्षांचा महापौर कार्यकाळ कुणाला मिळणार, यावरून महायुतीतील दोन्ही पक्षांत रस्सीखेच सुरू असून, “सत्ता एकत्र, पण महापौर कोणाचा?” हा प्रश्न मुंबईच्या राजकारणात केंद्रस्थानी आला आहे.
अशातच आता महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा शब्दयुद्धाला धार चढली असून, शिवसेना (एकनाथ शिंदे गट) नेत्या शीतल म्हात्रे यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर ‘एक्स’ (X) वरून जोरदार टीका केली आहे. राऊतांनी केलेल्या वक्तव्याला प्रत्युत्तर देताना म्हात्रेंनी उपरोधिक आणि खोचक शब्दांत टोलेबाजी केली असून, त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.
शीतल म्हात्रे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “एवढी वर्ष मातोश्रीची भाकरी खाऊन सिल्व्हर ओकची चाकरी केली... आता काकांनी चाकरी आणि मातोश्रीने भाकरी बंद केली वाटतं? त्यामुळे बहुतेक ताजमध्ये जेवायला येताय.”
या विधानातून त्यांनी थेट संजय राऊतांवर निशाणा साधला आहे.
ही टीका अशा पार्श्वभूमीवर आली आहे की, संजय राऊत यांनी थोड्या वेळापूर्वी माध्यमांशी बोलताना ताज हॉटेल येथे जेवायला जाणार असल्याचे वक्तव्य केले होते. राऊत म्हणाले होते की, एकनाथ शिंदे यांनी ताज हॉटेलमध्ये ठेवलेल्या नगरसेवकांच्या ठिकाणी आपण जेवायला जाणार आहोत. त्यांच्या या विधानानेच राजकीय वादाला तोंड फुटले.
हेही वाचा: Atal Setu Toll-Free: मुंबईकर आता सुस्साट! अटल सेतूवरून करा मोफत प्रवास, मात्र 'या' गाड्यांना भरावा लागणार...
याच वक्तव्याला उत्तर देताना शीतल म्हात्रे पुढे म्हणाल्या, “या, या… तुमचं स्वागत आहे... खाल्ल्या मिठाला जागायची सवय तेवढी लावून घ्या…” या वाक्यातून त्यांनी केवळ राऊतांवरच नव्हे, तर सध्याच्या राजकीय घडामोडींवरही उपरोधिक भाष्य केल्याचे मानले जात आहे.
संजय राऊत विरुद्ध शिंदे गट असा संघर्ष याआधीही अनेकदा उफाळून आला आहे. मात्र, यावेळी ताज हॉटेल, नगरसेवक आणि जेवणाच्या विधानावरून सुरू झालेली टोलेबाजी अधिकच लक्षवेधी ठरत आहे. सोशल मीडियावर या पोस्टवर समर्थक आणि विरोधकांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान, राऊत या टीकेला काय प्रत्युत्तर देतात, शिंदे गटाकडून आणखी कोणती प्रतिक्रिया येते आणि हा वाद पुढे कोणते राजकीय वळण घेतो, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा: BMC Election 2026 : मुंबई महापालिकेत अमराठी नगरसेवकांची फौज! तब्बल 76 विजयी चेहऱ्यांमुळे महापौरपदाच्या गणितात नवा ट्वीस्ट