NISAR Satellite NASA-ISRO: भारत आता नैसर्गिक आपत्तींची आगाऊ माहिती मिळविणाऱ्या प्रगत तंत्रज्ञानाच्या युगात प्रवेश करत आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) आणि अमेरिकन अंतराळ संस्था (NASA) यांच्या संयुक्त प्रयत्नातून विकसित करण्यात आलेला NISAR (NASA-ISRO Synthetic Aperture Radar) उपग्रह आज, 7 नोव्हेंबर रोजी कार्यान्वित झाला आहे. हा उपग्रह पृथ्वीवरील भूकंप, ज्वालामुखी, भूस्खलन, हिमवर्षाव आणि हवामानातील बदलांचा मागोवा घेणार आहे.
30 जुलैला झाले होते प्रक्षेपण
हा उपग्रह 30 जुलै रोजी आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून प्रक्षेपित करण्यात आला होता. आज तो अधिकृतपणे कार्यरत झाला असून, पर्यावरणीय आणि हवामान निरीक्षण क्षेत्रात क्रांती घडवून आणेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
हेही वाचा - CERT-In Warning: लाखो अँड्रॉइड युजर्सवर मोठं संकट! 'हे' अपडेट लगेच करा नाहीतर वाढेल धोका
निसार उपग्रहाची वैशिष्ट्ये
वजन : 2400 किलो
अँटेना : 12 मीटरचा मोठा रडार अँटेना
निरीक्षण क्षमता : दर 12 दिवसांनी पृथ्वीची संपूर्ण प्रतिमा
मोहिमेचा कालावधी : 5 वर्षे
डेटा : सर्वांना मोफत उपलब्ध
हा उपग्रह दोन उच्च कार्यक्षम नासाचा L-बँड आणि इस्रोचा S-बँड रडारांनी सुसज्ज आहे, जे एकत्रितपणे 240 किमीपर्यंतच्या क्षेत्राची तपशीलवार माहिती पाठवतील.
NISAR कोणती माहिती देईल ?
NISAR उपग्रह पृथ्वीवरील हालचालींचे तपशीलवार विश्लेषण करेल. त्यामुळे शास्त्रज्ञांना भूकंप, त्सुनामी, ज्वालामुखी, हिमनद्या वितळणे, चक्रीवादळे, शेतीतील बदल, वणवे आणि वाढती समुद्रपातळी यासंबंधी आगाऊ चेतावणी देणे शक्य होईल. याचबरोबर, हा उपग्रह पर्यावरणातील हरितगृह वायूंचे नियमन, कार्बन संचयन, आणि पाणथळ जागांमधील बदल समजण्यासाठीही अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.
S-बँड आणि L-बँड रडारचे कार्य
L-बँड : दाट जंगलांमधील मातीची आर्द्रता, बर्फ आणि जमीन हालचाल मोजते.
S-बँड : शेती आणि गवताळ प्रदेशातील सूक्ष्म बदल टिपतो.
दोन्ही रडार दिवस-रात्र, पाऊस आणि ढगांमध्येही डेटा गोळा करू शकतात, हे त्यांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे.
हेही वाचा - Google Maps चे नवे फीचर: आता 'कोणती लेन घ्यायची' हेही सांगणार! तुमच्या कारला ही सुविधा कधी मिळणार?
सीमासुरक्षेसाठीही उपयुक्त
या उपग्रहातून मिळणाऱ्या उच्च-रिझोल्यूशन प्रतिमा भारताला हिमालयातील हिमनद्या आणि सीमावर्ती भागांवरील हालचालींचे निरीक्षण करण्यास मदत करतील. त्यामुळे भारताला चीन आणि पाकिस्तानसोबतच्या सीमांवरील बदल अधिक नेमकेपणाने समजून घेता येतील. ISRO प्रमुख व्ही. नारायणन यांनी सांगितले की, NISAR प्रकल्प देशासाठी ऐतिहासिक ठरेल. त्यांनी पुढे सांगितले की, गगनयान मोहिमेची पहिली मानवरहित चाचणी जानेवारीत केली जाईल. 2027 पर्यंत भारतीय अंतराळवीरांना स्वदेशी रॉकेटद्वारे अवकाशात पाठवण्याचे ISRO चे उद्दिष्ट आहे. तसेच, 2028 पर्यंत भारताचे स्वतःचे अंतराळ स्थानक सुरू करण्याचा आणि 2035 पर्यंत पूर्णपणे कार्यरत करण्याचाही आराखडा तयार आहे.