Monday, March 09, 2026 02:42:54 AM

Tejas Jet Grounded: तेजस जेटचा पुन्हा अपघात! लँडिंगदरम्यान विमान धावपट्टीवरून घसरले; ब्रेक फेल झाले अन्...

भारतीय वायुसेनेचे तेजस लढाऊ विमान लँडिंगदरम्यान धावपट्टी ओलांडल्याची घटना समोर आली असून ब्रेक निकामी झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

tejas jet grounded तेजस जेटचा पुन्हा अपघात लँडिंगदरम्यान विमान धावपट्टीवरून घसरले ब्रेक फेल झाले अन्

नवी दिल्ली: भारतीय वायुसेनेचे लढाऊ विमान तेजस लँडिंगदरम्यान धावपट्टीच्या पुढे गेल्याची घटना समोर आली आहे. प्राथमिक चौकशीत ब्रेक निकामी झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. वृत्तसंस्था एएनआयने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 7 फेब्रुवारी रोजी घडली असून तिची माहिती आता उघड झाली आहे.

हे तेजस विमान प्रशिक्षण उड्डाण पूर्ण करून एअरबेसवर परतत होते. लँडिंगदरम्यान वैमानिकाने विमान थांबवण्यासाठी ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला, मात्र ब्रेक प्रतिसाद देत नसल्याने विमान धावपट्टी ओलांडून पुढे गेले. संभाव्य दुर्घटनेची चाहूल लागताच वैमानिकाने वेळेत सुरक्षितरीत्या बाहेर पडण्यात यश मिळवले. या घटनेत विमानाचे काही प्रमाणात नुकसान झाले असून ही घटना नेमक्या कोणत्या एअरबेसवर घडली याबाबत अधिकृत माहिती अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.

घटनेनंतर भारतीय वायुसेनेने मोठा खबरदारीचा निर्णय घेत सुमारे 30 सिंगल-सीट तेजस लढाऊ विमानांचा संपूर्ण ताफा तांत्रिक तपासणीसाठी तात्पुरता ग्राउंड केला आहे. तपास पूर्ण होईपर्यंत ही विमाने उड्डाण करणार नसल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र या अपघाताबाबत भारतीय वायुसेनेकडून अद्याप अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेले नाही.

हेही वाचा: Maharashtra Budget Session: आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरूवात; कोणते विषय ठरणार चर्चेचे केंद्रबिंदू?

दरम्यान, तेजस लढाऊ विमानाशी संबंधित ही तिसरी गंभीर घटना ठरत आहे. यापूर्वी मार्च 2024 मध्ये राजस्थानमधील जैसलमेरजवळ तेजस विमान कोसळले होते. ‘भारत शक्ती’ युद्धसरावात सहभागी असलेले हे विमान जैसलमेर शहरापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावरील जवाहर नगर परिसरातील भील समाजाच्या वसतिगृहावर कोसळले होते. इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे हा अपघात घडल्याचे तपासात समोर आले होते. अपघातापूर्वी वैमानिकाने ग्राउंड स्टाफला इंजिनमधील तांत्रिक बिघाडाची माहिती दिली होती आणि त्यानंतर सुरक्षितपणे इजेक्शन केले होते.

त्यानंतर नोव्हेंबर 2025 मध्ये दुबई एअर शोदरम्यान आणखी एक मोठी दुर्घटना घडली होती. अल मकतूम विमानतळावर सुरू असलेल्या एरियल डेमो फ्लाइटदरम्यान तेजस लढाऊ विमान कोसळले आणि त्याला भीषण आग लागली. अपघातानंतर आकाशात काळ्या धुराचे लोट दिसून आले होते. या दुर्घटनेत भारतीय वायुसेनेचे विंग कमांडर नमांश स्याल यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. ते हिमाचल प्रदेशातील कांगडा येथील रहिवासी होते.

सलग घडलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर तेजस लढाऊ विमानांच्या तांत्रिक सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली असून सध्या सुरू असलेली तपासणी भविष्यातील उड्डाण सुरक्षेसाठी महत्त्वाची ठरणार असल्याचे संरक्षण तज्ज्ञांचे मत आहे.

हेही वाचा: Chhatrapati Sambhajinagar: मद्यधुंद व्यक्तीकडून वाहतूक पोलिसाला शिवीगाळ करत मारहाण; आरोपीसह पत्नीवरही गुन्हा दाखल


सम्बन्धित सामग्री