छत्रपती सांभाजीनगर: राज्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच पोलिसांवर हल्ल्यांच्या घटनाही चिंताजनकरीत्या वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. अशातच छत्रपती संभाजीनगर शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली असून वाहतूक पोलिसावर मद्यधुंद व्यक्तीने हल्ला केल्याची घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमनाथ गिरी असे आरोपीचे नाव असून त्याने वाहतूक पोलीस कर्मचारी संतोष खरात यांच्यावर सिग्नलजवळ मारहाण केल्याचा आरोप आहे. यावेळी आरोपीने पोलिसांशी हुज्जत घालत शिवीगाळ केली तसेच संतापाच्या भरात त्यांच्यावर हात उगारल्याचे समोर आले आहे.
घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी केलेल्या व्हिडिओ चित्रीकरणात आरोपी पोलिसांशी वाद घालत असल्याचे आणि हात उगारताना स्पष्ट दिसत असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. या संदर्भातील माहिती जय महाराष्ट्र न्यूजचे प्रतिनिधी विजय चिडे यांनी दिली आहे.
दरम्यान, संबंधित आरोपी चारचाकी वाहनातून छत्रपती संभाजीनगर येथील उच्च न्यायालय परिसरातून जात होता. संशय आल्याने वाहतूक पोलिसांनी वाहन थांबवून तपासणी केली असता चालक मद्यधुंद अवस्थेत आढळून आला. त्याच्यावर कारवाईबाबत विचारणा करताच आरोपी आक्रमक झाला आणि त्याने पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला केला.
या प्रकरणी पोलिसांनी आरोपी सोमनाथ गिरी तसेच त्याच्या पत्नीला ताब्यात घेतले असून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पुढील कायदेशीर कारवाई सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
दरम्यान, या घटनेमुळे राज्यात पोलिसांवर होणाऱ्या हल्ल्यांचे प्रमाण वाढत असल्याची गंभीर बाब पुन्हा एकदा समोर आली असून कायदा आणि सुव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.