Pakistani Boat : भारतीय तटरक्षक दलाने (Indian Coast Guard) 14 जानेवारीच्या रात्री अरबी समुद्रात पाकिस्तानचा एक मोठा कट उधळून लावला आहे. आंतरराष्ट्रीय सागरी सीमा ओलांडून भारतीय हद्दीत बेकायदेशीरपणे शिरकाव करणारी एक पाकिस्तानी मासेमारी बोट तटरक्षक दलाने सिनेस्टाईल पाठलाग करून पकडली. या बोटीवरील 9 कर्मचाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांना पुढील तपासासाठी गुजरातच्या पोरबंदर बंदरात आणले जात आहे.
अंधाराचा फायदा घेत पळण्याचा प्रयत्न
मिळालेल्या माहितीनुसार, 14 जानेवारीच्या रात्री भारतीय तटरक्षक दलाचे जहाज अरबी समुद्रात गस्त घालत होते. यावेळी सीमा रेषेजवळ एक संशयास्पद पाकिस्तानी बोट दिसून आली. भारतीय जवानांनी आव्हान देताच बोटीवरील कर्मचाऱ्यांनी अंधाराचा फायदा घेत पुन्हा पाकिस्तानच्या दिशेने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, भारतीय तटरक्षक दलाच्या जहाजाने अत्यंत शिताफीने ही बोट रोखली आणि त्यावर चढून नऊ जणांना बेड्या ठोकल्या.
हेही वाचा - Union Budget 2026 : अर्थ मंत्रालयाचे कार्यालय बदलले, गोपनीय अर्थसंकल्पीय कागदपत्रे आता कुठे छापली जाणार?
'अल-मदिना' बोट ताब्यात; सखोल चौकशी सुरू
'अल-मदिना' असे या पाकिस्तानी बोटीचे नाव असून, तिला सध्या पोरबंदरच्या दिशेने ओढून आणले जात आहे. या बोटीमध्ये काही संशयास्पद वस्तू किंवा अंमली पदार्थ आहेत का, याचा तपास करण्यासाठी विविध सुरक्षा यंत्रणांमार्फत संयुक्त चौकशी केली जाणार आहे. गेल्या डिसेंबरमध्येही अशीच एक कारवाई करत 11 पाकिस्तानी नागरिकांना ताब्यात घेण्यात आले होते.
हेही वाचा - Army Day 2026: अग्निवीर कुलबीर सिंग यांचा ऐतिहासिक पराक्रम; 'शौर्य पदक' मिळवणारे ठरले देशातील पहिले अग्निवीर
'ऑपरेशन सिंदूर'नंतर सीमांवर हाय अलर्ट
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या प्रत्युत्तरादाखल भारताने 'ऑपरेशन सिंदूर' सुरू केले आहे. या पार्श्वभूमीवर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव शिगेला पोहोचला आहे. अलीकडेच नियंत्रण रेषेजवळ (LoC) पाकिस्तानी ड्रोनच्या हालचाली वाढल्याने लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी पाकिस्तानला कडक इशारा दिला आहे. 'ऑपरेशन सिंदूर' केवळ थांबवण्यात आले असून पाकिस्तानने कोणतेही दुःसाहस केल्यास त्याला गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, असे भारतीय उच्च नेतृत्वाने स्पष्ट केले आहे. याच सतर्कतेमुळे सागरी सीमांवरही आता कडक पहारा ठेवला जात आहे.