जयपूर: आयपीएल 2026 च्या 52 व्या रोमांचक सामन्यात गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सचा 77 धावांनी मोठा पराभव करत दिमाखदार विजय मिळवला आहे. प्रथम फलंदाजी करताना कर्णधार शुभमन गिल आणि साई सुदर्शन यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर गुजरातने धावसंख्येचा डोंगर उभा केला. त्यानंतर गोलंदाजीमध्ये रशिद खान आणि कगिसो रबाडा यांनी केलेल्या भेदक माऱ्यासमोर राजस्थानच्या फलंदाजांनी सपशेल नांगी टाकली. या विजयामुळे गुजरातचा संघ आता गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर झेप घेत प्ले-ऑफच्या अगदी जवळ पोहोचला आहे.
शुभमन आणि सुदर्शनचा धावांचा पाऊस
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला उतरलेल्या गुजरात टायटन्सने 20 षटकांत 4 गड्यांच्या मोबदल्यात 229 धावांचा विशाल धावसंख्या उभारली. कर्णधार शुभमन गिलने पुन्हा एकदा आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करत 44 चेंडूत 84 धावांची तडाखेबंद खेळी केली. यात 9 चौकार आणि 3 उत्तुंग षटकारांचा समावेश होता. त्याला साई सुदर्शनने मोलाची साथ दिली. सुदर्शनने 36 चेंडूत 55 धावा फटकावून संघाला मजबूत स्थितीत नेऊन ठेवले. या दोघांच्या फलंदाजीमुळे राजस्थानचे गोलंदाज हतबल झाल्याचे पाहायला मिळाले.
रशिद खानची फिरकी आणि राजस्थानची दाणादाण
230 धावांचे मोठे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या राजस्थान रॉयल्सची सुरुवात तशी समाधानकारक झाली होती. वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जयस्वाल यांनी अवघ्या 17 चेंडूत 38 धावांची भागीदारी केली. मात्र, 36 धावा करून सूर्यवंशी बाद झाला आणि तिथून राजस्थानच्या डावाला गळती लागली. एकापाठोपाठ एक गडी बाद होत गेल्यामुळे राजस्थानचा संघ सावरू शकला नाही. गुजरातच्या गोलंदाजांनी शिस्तबद्ध मारा करत राजस्थानला 16.3 षटकांत 152 धावांवर गुंडाळले.
हेही वाचा: WFI Ban on Vinesh Phogat: विनेश फोगटला मोठा धक्का, WFI कडून बंदीची कारवाई; 'नॅशनल रँकिंग' स्पर्धेत खेळण्यावर गदा
गोलंदाजांनी गाजवले मैदान
गुजरातच्या विजयात गोलंदाजांचा वाटा अत्यंत महत्त्वाचा ठरला. स्टार फिरकीपटू रशिद खानने आपल्या फिरकीच्या जाळ्यात राजस्थानच्या 4 फलंदाजांना अडकवले. त्याला जेसन होल्डरने 3 बळी घेत उत्तम साथ दिली, तर वेगवान गोलंदाज कगिसो रबाडाने 2 आणि मोहम्मद सिराजने 1 गडी बाद केला. राजस्थानकडून रवींद्र जडेजाने 38 धावांची झुंजार खेळी केली, पण ती पराभव टाळण्यासाठी पुरेशी ठरली नाही. ध्रुव जुरेल आणि शुभम दुबे यांनाही फारशी चमक दाखवता आली नाही.
प्ले-ऑफच्या शर्यतीत गुजरातची मोठी झेप
या विजयासह गुजरात टायटन्सचे आता 14 गुण झाले असून ते गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर विराजमान झाले आहेत. गुजरातचे आता केवळ 3 सामने शिल्लक असून त्यांचे प्ले-ऑफमधील स्थान जवळपास निश्चित मानले जात आहे. दुसरीकडे, या पराभवामुळे राजस्थान रॉयल्सला मोठा फटका बसला असून ते आता पहिल्या चार संघांच्या (Top-4) शर्यतीतून बाहेर पडले आहेत. गुजरातच्या या अष्टपैलू कामगिरीमुळे आता उर्वरित सामन्यांमधील चुरस अधिकच वाढली आहे.
हेही वाचा: Supriya Sule Car Accident: खासदार सुप्रिया सुळे यांच्या गाडीचा अपघात, मुंबई-पुणे महामार्गावर भरधाव वाहनाची जोरदार धडक