Israel Iran War: इस्रायलसोबतच्या सुरू असलेल्या युद्धादरम्यान इराणने भारतासाठी आपले हवाई क्षेत्र खुले केले आहे. यामुळे भारत सरकारने ऑपरेशन सिंधू अंतर्गत इराणमध्ये अडकलेल्या सुमारे 1,000 भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्यासाठी पावले उचलली आहेत. पुढील दोन दिवसांत 3 विशेष चार्टर्ड विमानांच्या साहाय्याने या विद्यार्थ्यांना भारतात आणले जाणार आहे.
विद्यार्थ्यांना घेऊन येणारी पहिली फ्लाइट शुक्रवारी रात्री भारतात पोहोचेल, तर उर्वरित दोन विमानं शनिवारी दुपारपर्यंत भारतात दाखल होतील. ही उड्डाणे इराणमधील मशहद शहरातून उड्डाण करतील आणि थेट दिल्लीत उतरतील. या संपूर्ण प्रक्रियेची व्यवस्था भारत सरकारकडून करण्यात आली आहे.
हेही वाचा: International Yoga Day 2025: आळस, थकवा आणि तणाव दूर ठेवण्यासाठी 'ही' 10 योगासने उपयुक्त; जाणून घ्या
यापूर्वी, 19 जून रोजी 110 भारतीय विद्यार्थी इराणहून मायदेशी पोहोचले होते. मात्र, त्यावेळी इराणचे हवाई क्षेत्र आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी बंद असल्यामुळे त्या विद्यार्थ्यांना जमीनी सीमेवरून बाहेर काढण्यात आले होते. 13 जून रोजी इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणने आपले हवाई क्षेत्र बंद केले होते.
आज इस्रायल-इराण युद्धाचा आठवा दिवस असून, सकाळीच इराणने इस्रायलच्या बेरशेबा शहरातील मायक्रोसॉफ्ट ऑफिसजवळ बॅलिस्टिक क्षेपणास्त्र हल्ला केला. या हल्ल्यामुळे अनेक गाड्यांना आग लागली असून, आजूबाजूच्या घरांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. गुरुवारी इराणने बेरशेबा येथील एका रुग्णालयावर हल्ला केला होता, ज्यात 50 हून अधिक लोक जखमी झाले होते.