Kangana Ranaut Gen Z Comments: अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रणौत यांनी दिल्लीतील जंतर-मंतर आणि इतर शहरांमध्ये नुकत्याच पार पडलेल्या विद्यार्थ्यांच्या सीजेपी (CJP) आंदोलनादरम्यान व्हायरल झालेल्या रील्स आणि व्हिडीओंवर अत्यंत बोचरी टीका केली आहे. आंदोलकांचे फलक, घोषणा आणि पोस्ट्स अत्यंत ओंगळ आणि किळसवाणी असल्याचा आरोप करत तिने संताप व्यक्त केला. एकाच ठिकाणी इतका कुरुपपणा आणि असभ्यपणा आपल्या आयुष्यात कधीही पाहिला नसल्याचे सांगत या रील्समुळे आपल्याला प्रचंड मनस्ताप झाला असून सावरण्यासाठी 'डिजिटल डिटॉक्स'ची गरज असल्याचे त्यांनी सोशल मीडियावर लिहिले.
तरुणांच्या संगोपनावर आणि वर्तनावर उपस्थित केले प्रश्न
आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये कंगना यांनीआंदोलकांच्या संगोपनावरच थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले. भारत हा सांस्कृतिकदृष्ट्या प्रगल्भ आणि शालीन लोकांचा देश असताना, हे तरुण स्वतःला झुरळ म्हणवून घेत आहेत आणि तसेच वर्तन करत आहेत, असे ताशेरे तिने झाडले. ही पिढी जगाला फक्त घाण आणि कुरुपपणा दाखवत असून अशा मुलांना कोण जन्म देतं आणि कसं वाढवतं, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
महिलांवर आक्षेपार्ह टिप्पणी आणि 'जनरेशन गटर' असा उल्लेख
कंगनाने या आंदोलनात सहभागी झालेल्या महिलांवर आणि आजच्या तरुण पिढीवर तीव्र शब्दांत ताशेरे ओढले. त्यांनी आजच्या तरुण पिढीचा 'जनरेशन गटर' असा उल्लेख केला. या महिला अभ्यासात चांगल्या नाहीत आणि त्या गृहिणी बनण्याच्या पात्रतेच्याही राहिलेल्या नाहीत, अशी आक्षेपार्ह टिप्पणी केली. तसेच, पालकांच्या पैशांवर जगणे आणि दारू, ड्रग्ज पिण्याच्या स्वातंत्र्याचा मिजाशीने देखावा करणे हीच यांची ओळख बनली असल्याचा आरोपही केला.
हेही वाचा – CJP Protest : विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी रस्त्यावर उतरली अन् स्वतःच फसली; अभिनेत्रीच्या अडचणी वाढल्या, नेमकं काय घडलं?
विरोधकांचे प्रत्युत्तर आणि भाई जगताप यांची टीका
कंगना रणौत यांच्या या वादग्रस्त वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. काँग्रेस नेते भाई जगताप यांनी कंगना यांच्यावर निशाणा साधत सवाल केला की, आंदोलनादरम्यान ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांना आणि विशेषतः तरुणींना मारहाण झाली, गैरवर्तन केले गेले, त्याबद्दल कंगना यांना काही पश्चात्ताप वाटतो का? स्वतः एक महिला असूनही त्यांच्या मनात आंदोलक मुलींबद्दल थोडीही हळहळ नसणे हे अत्यंत आश्चर्यकारक असल्याचे जगताप यांनी म्हटले.
सोशली आणि राजकीयदृष्ट्या वाढता विरोध
आंदोलनकर्त्यांवर वक्तव्य करताना खासदार पदाची आचारसंहिता आणि भाषेची मर्यादा पाळली गेली नाही, असा आरोप विरोधकांकडून होत आहे. एका बाजूला विद्यार्थ्यांनी आपले आंदोलन मागे घेतले असताना, दुसऱ्या बाजूला कंगना रणौत यांच्या या 'जनरेशन गटर' आणि आक्षेपार्ह टिप्पण्यांमुळे सोशल मीडियावर आणि राजकीय क्षेत्रात विरोधाचा मोठा वाद पेटला आहे.