श्रीनगर: निसर्गाचे नंदनवन मानल्या जाणाऱ्या काश्मीर खोऱ्यात सध्या चिंताजनक स्थिती निर्माण झाली आहे. मंगळवारी झालेल्या तुफानी बर्फवृष्टीमुळे श्रीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळावरील हवाई वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. धावपट्टीवर बर्फाचा जाड थर साचल्याने आणि दृश्यमानता कमी झाल्याने विमानतळ प्राधिकरणाने प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी कठोर पाऊल उचलत एकूण 58 उड्डाणे रद्द केली. यामध्ये 29 येणारी आणि 29 जाणारी विमाने होती. अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे प्रजासत्ताक दिनाच्या दीर्घ सुट्ट्यांचा आनंद लुटून घरी परतण्याच्या तयारीत असलेल्या शेकडो पर्यटकांच्या आनंदावर विरजण पडले असून, ते सध्या खोऱ्यात अडकून पडले आहेत.
धावपट्टी विमान उड्डाणासाठी जोपर्यंत 'फिट' घोषित होत नाही, तोपर्यंत उड्डाणे सुरू करणे धोक्याचे असल्याचे विमानतळ प्रशासनाने स्पष्ट केले आहे. "प्रवाशांची सुरक्षा हीच प्राथमिकता आहे," असे सांगत अधिकारी सध्या हवामानातील बदलावर बारीक लक्ष ठेवून आहेत.
धावपट्टीवरील बर्फ हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असले तरी निसर्गापुढे सध्या यंत्रणा हतबल दिसत आहे. केवळ हवाई मार्गच नव्हे, तर रस्ते आणि रेल्वे सेवेलाही या हिमवृष्टीचा मोठा फटका बसला आहे. श्रीनगर-जम्मू हा महत्त्वाचा राष्ट्रीय महामार्ग खबरदारीचा उपाय म्हणून बंद ठेवण्यात आला असून, अनेक ठिकाणी वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.
हेही वाचा: Anagar: 7 ते 9 ‘नो मोबाईल-नो टीव्ही’! ‘या’ तरुण महिला नगराध्यक्षांनी का उचललं हे धाडसी पाऊल ?
उत्तराखंडमध्येही परिस्थिती वेगळी नाही. देवभूमी सध्या 'श्वेत' रंगात न्हाऊन निघाली आहे. गेल्या काही दिवसांतील ही दुसरी मोठी हिमवृष्टी असून, चमोली जिल्ह्यातील बद्रीनाथ धाम आणि रुद्रप्रयाग येथील केदारनाथ मंदिर परिसराने बर्फाची चादर ओढली आहे.
सोमवारी रात्रीपासून सुरू झालेल्या या बर्फवृष्टीमुळे पर्वतरांगांचे सौंदर्य खुलले असले तरी बोचऱ्या थंडीने स्थानिक नागरिकांना घरातच राहण्यास भाग पाडले आहे. उत्तरकाशी जिल्ह्यातील बंदरपुंच पर्वतशिखर आणि गंगोत्री-यमुनोत्री परिसरातही ढगाळ हवामानासह अधूनमधून हिमवर्षाव होत असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
हिमालयीन पट्ट्यात सुरू असलेल्या या लहरी हवामानामुळे पर्यटनाला चालना मिळत असली, तरी प्रवाशांच्या अडचणीत मात्र मोठी भर पडली आहे. अनेक पर्यटकांना याचा त्रास होत आहे. हॉटेलचे बुकिंग संपलेले असताना आणि घरी जाण्याचे मार्ग बंद असताना त्यांना कडाक्याच्या थंडीत निवार्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. स्थानिक प्रशासनाने पर्यटकांना संयम बाळगण्याचे आणि हवामान खात्याच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.
हेही वाचा: Global Firepower Index: युद्ध झाल्यास कोण ठरणार वरचढ? ग्लोबल फायरपॉवर रँकिंगमध्ये भारताने जगाला दाखवले सामर्थ्य; बघा कितव्या क्रमांकावर आहे आपला देश?