Monday, May 11, 2026 12:49:34 PM

Kearalam Election Result 2026: केरळमध्ये काँग्रेसची 'लाट'! 96 जागांवर आघाडी घेत UDFची ऐतिहासिक घोडदौड, डाव्या आघाडीची सत्ता धोक्यात?

केरळ निवडणुकीत काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूडीएफने 96 जागांवर आघाडी घेत बहुमत पार केले असून एलडीएफ पिछाडीवर आहे.

kearalam election result 2026 केरळमध्ये काँग्रेसची लाट 96 जागांवर आघाडी घेत udfची ऐतिहासिक घोडदौड डाव्या आघाडीची सत्ता धोक्यात

केरळमच्या राजकीय रणांगणातून काँग्रेससाठी अत्यंत सुखद आणि उत्साहवर्धक बातमी समोर येत आहे. विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत सुरुवातीला पाहायला मिळालेली अटीतटीची लढत आता एका बाजूला झुकताना दिसत आहे. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील 'युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट'ने (UDF) मतमोजणीच्या ताज्या कलानुसार बहुमताचा आकडा पार केला असून केरळमध्ये सत्तांतराचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. सद्यस्थितीत यूडीएफ 96 जागांवर आघाडीवर असून राज्याच्या राजकारणात काँग्रेसची मोठी लाट आल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.

सुरुवातीची चुरस आणि यूडीएफची मुसंडी

आज सकाळी मतमोजणीला सुरुवात झाली तेव्हा डावी आघाडी (LDF) आणि काँग्रेस आघाडी (UDF) यांच्यात 'काटे की टक्कर' पाहायला मिळाली. सुरुवातीच्या कलानुसार डाव्यांनी 45 जागांवर तर काँग्रेसने 32 जागांवर आघाडी घेतली होती. मात्र, जशा मतमोजणीच्या फेऱ्या पुढे सरकल्या, तसे चित्र पूर्णपणे बदलले. काँग्रेस आघाडीने 64, त्यानंतर 83 आणि आता थेट 94 ते 96 जागांपर्यंत मजल मारत डाव्या आघाडीला मोठ्या फरकाने पिछाडीवर टाकले आहे.

डाव्या आघाडीच्या बालेकिल्ल्याला खिंडार

गेल्या काही वर्षांपासून केरळमध्ये आपली पकड मजबूत ठेवणाऱ्या मुख्यमंत्री Pinarayi Vijayan यांच्या नेतृत्वाखालील डाव्या आघाडीला (LDF) यंदा मोठ्या आव्हानाचा सामना करावा लागत आहे. सुरुवातीला 64 जागांवर आघाडीवर असलेल्या डाव्यांचा आकडा आता 42 वर येऊन ठेपला आहे. सत्ता राखण्यासाठी धडपडणाऱ्या एलडीएफसाठी हे कल अत्यंत चिंताजनक मानले जात आहेत. केरळचा मतदार दर पाच वर्षांनी सत्ता बदलण्याच्या आपल्या पारंपरिक 'पॅटर्न'कडे पुन्हा एकदा वळताना दिसत आहे.

हेही वाचा: West Bengal Election 2026: बंगालमध्ये 'कमळ' फुलणार? सुरुवातीच्या कलानं वाढवलं ममतादीदींचं टेंशन, भाजपची बहुमताकडे वेगाने घोडदौड

काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण

केरळमध्ये काँग्रेस आघाडीने बहुमताचा 71 हा आकडा ओलांडून 96 जागांपर्यंत झेप घेतल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे उधाण आले आहे. दक्षिण भारतातील हे राज्य काँग्रेससाठी संजीवनी ठरू शकते, असा विश्वास राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त केला जात आहे. विशेषतः राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील प्रचाराचा आणि स्थानिक मुद्द्यांचा मतदारांवर मोठा प्रभाव पडल्याचे या निकालांच्या कलानं सिद्ध होत आहे.

अंतिम निकालाकडे सर्वांचे लक्ष

केरळमध्ये मतमोजणीची प्रक्रिया अद्याप सुरू असून प्रत्येक फेरीनुसार आकडेवारी बदलत आहे. मात्र, सुरुवातीपासून यूडीएफने राखलेली ही मोठी आघाडी पाहता, केरळमध्ये काँग्रेसचे सरकार येणे आता केवळ औपचारिकता उरल्याची चर्चा सुरू झाली आहे. प्रशासनाकडून मतमोजणी केंद्रांवर कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, दुपारपर्यंत या विजयावर अधिकृत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. केरळचा हा निकाल आगामी राष्ट्रीय राजकारणावरही मोठे परिणाम करणारा ठरेल, यात शंका नाही. 

हेही वाचा: Tamilnadu Election Result 2026: सिनेस्टारच्या हाती जाणार राज्याची सूत्र? तमिळनाडूत 'विजयी' घोडदौड, 'TVK' 74 जागांवर आघाडीवर


सम्बन्धित सामग्री