Sunday, November 16, 2025 06:53:52 PM

Sabarimala Gold Theft Case: केरळ SIT ची मोठी कारवाई! शबरीमला सोने चोरी प्रकरणात मुख्य आरोपी उन्नीकृष्णन पोट्टी अटकेत

पोट्टी यांनी 2019 मध्ये मंदिरातील दोन सोन्याचा मुलामा असलेले तांबे पॅनेल गायब झाल्याचे उघड केले होते. या खुलाशानंतर ते तपासाच्या केंद्रस्थानी आले.

sabarimala gold theft case केरळ sit ची मोठी कारवाई शबरीमला सोने चोरी प्रकरणात मुख्य आरोपी उन्नीकृष्णन पोट्टी अटकेत

Sabarimala Gold Theft Case: शबरीमला अय्यप्पा मंदिरातील सोन्याचा मुलामा असलेल्या तांब्याच्या साच्यांच्या गैरवापर प्रकरणी केरळ उच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) प्रमुख आरोपी उन्नीकृष्णन पोट्टी याला शुक्रवारी पहाटे अटक केली आहे. धार्मिक आणि राजकीय दृष्ट्या संवेदनशील मानल्या जाणाऱ्या या प्रकरणातील ही पहिली अटक आहे. देवस्वोम मंत्री व्ही. एन. वासवन आणि त्रावणकोर देवस्वोम बोर्ड (टीडीबी) अध्यक्ष पी. एस. प्रशांत यांच्या राजीनाम्याची मागणी करत विरोधकांनी सुरू केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली.

एसआयटीने गुरुवारी पोट्टी यांना चौकशीसाठी बोलावले होते. त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी तिरुवनंतपुरम येथील जनरल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आणि त्यानंतर औपचारिक अटक करण्यात आली. पोट्टी यांनी 2019 मध्ये मंदिरातील दोन सोन्याचा मुलामा असलेले तांबे पॅनेल गायब झाल्याचे उघड केले होते. या खुलाशानंतर ते तपासाच्या केंद्रस्थानी आले. 2010 च्या दशकाच्या सुरुवातीस पोटी हे शबरीमला मंदिरात टीडीबी नियुक्त पुजाऱ्यांचे सहाय्यक म्हणून कार्यरत होते.

हेही वाचा - Diwali 2025: सावधान! मिठाईत होतेय भेसळ, दोन महिन्यात सुमारे दोन कोटी रुपयांचे भेसळयुक्त पदार्थ जप्त

दरम्यान, हे प्रकरण उघडकीस आल्यामुळे डाव्या लोकशाही आघाडी (LDF) सरकारला मोठा धक्का बसला आणि ग्लोबल अय्यप्पा संघमच्या माध्यमातून सबरीमला विकास योजनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर टीडीबीच्या दक्षता विभागाने चौकशी केली. त्यानंतर पोट्टी यांच्या बहिणीच्या घरातून गहाळ सोन्याचा मुलामा असलेले पॅनेल जप्त केले.

मंदिर नियमांचे उल्लंघन

दक्षतेच्या अहवालात नमूद करण्यात आले की टीडीबीने उद्योगपती विजय मल्ल्या यांनी 1998 मध्ये मंदिराला दिलेल्या सोन्या-तांब्याच्या आवरणाच्या पुनर्संचयितीसाठी कंत्राट पोट्टी यांना दिले होते. जे नियमांचे उल्लंघन होते. तसेच या वस्तूंची चेन्नईतील कारखान्यात पुनर्स्थापना करण्यासाठी 39 दिवसांचा वेळ घेतल्याने पॅनलची प्रतिकृती बनवून मूळ वस्तू खासगी संग्राहकाला विकल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

हेही वाचा - FSSAI Bans ORS Label : बालरोगतज्ञांच्या आठ वर्षांच्या लढ्याला यश; FSSAI ने अन्न उत्पादनांवर ORS वापरण्यास घातली बंदी, वाचा सविस्तर

एसआयटीचा तपास सुरू

या प्रकरणात एसआयटीने सात माजी आणि कार्यरत टीडीबी अधिकाऱ्यांची नावे आरोपी म्हणून दिली आहेत. पोट्टी यांना चौकशीसाठी न्यायालयीन कोठडीत घेण्याची मागणी एसआयटी करणार आहे. तपास अजून प्राथमिक टप्प्यात असून, 2019 मधील पोट्टी यांच्या मोबाईल कॉल रेकॉर्डचा मागोवा घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दक्षतेच्या अहवालानुसार, संशयितांनी या धार्मिक कलाकृती काही चित्रपट कलाकारांच्या घरी खाजगी पूजेसाठी ठेवल्या असल्याचेही समोर आले आहे. पठानमथिट्टा येथे या प्रकरणात दोन एफआयआर नोंदवण्यात आले असून, दोन्हीमध्ये उन्नीकृष्णन पोट्टी हे प्रमुख आरोपी म्हणून नमूद आहेत.


सम्बन्धित सामग्री