World's Safest Countries: वेलिंग्टन येथून प्रसिद्ध झालेल्या 'ग्लोबल पीस इंडेक्स' (जागतिक शांतता निर्देशांक) च्या 2026 च्या ताज्या अहवालात जगातील सुरक्षित देशांची वार्षिक क्रमवारी जाहीर करण्यात आली आहे. जगातील एकूण 163 देशांमधील सुरक्षा आणि शांततेच्या वातावरणाचे विश्लेषण करून हा अहवाल तयार करण्यात आला आहे. या यादीत आइसलँडने आपले अव्वल स्थान कायम राखत जगातील सर्वात सुरक्षित देश होण्याचा मान मिळवला आहे. मात्र, भारताला पहिल्या 100 देशांमध्येही स्थान मिळवता आलेले नाही. धक्कादायक बाब म्हणजे, युक्रेन युद्धामुळे भारताचा पारंपरिक मित्रदेश असलेला रशिया या यादीत थेट तळाला फेकला गेला असून तो जगातील सर्वात असुरक्षित देश ठरला आहे.
जागतिक पातळीवर शांतता खालावली
या वर्षीच्या अहवालातून एक चिंताजनक चित्र समोर आले आहे, त्यानुसार जगभरातील शांततेची सरासरी पातळी 0.7 टक्क्यांनी घसरली आहे. दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळात सध्या जगात सर्वाधिक 'राज्य-आधारित संघर्ष' सुरू आहेत. एकूण 163 देशांपैकी 99 देशांमधील परिस्थिती खालावली आहे, तर केवळ 62 देशांमध्ये सुधारणा झाली आहे. 2008 च्या तुलनेत तब्बल 119 देशांमध्ये शांततेचा स्तर खालावल्याचे या निर्देशांकात नमूद केले आहे. दक्षिण आशियाई देशांमध्ये विशेषतः नेपाळ आणि पाकिस्तानमधील अस्थिरतेमुळे या प्रदेशातील शांततेला मोठा फटका बसला आहे.
जगातील सर्वात सुरक्षित 10 देशांची यादी
सलग 19 व्या वर्षी आइसलँड जगातील सर्वात शांतताप्रिय देश ठरला आहे. स्वतःचे कायमस्वरूपी सैन्य नसणे, गुन्हेगारीचे नगण्य प्रमाण आणि नागरिकांमधील उच्च सामाजिक विश्वास ही या देशाच्या यशाची वैशिष्ट्ये आहेत. या यादीतील आघाडीचे 10 देश खालीलप्रमाणे आहेत:
आइसलँड
न्यूझीलंड (एक स्थानाची सुधारणा)
स्वित्झर्लंड
स्लोव्हेनिया (दोन स्थानांची प्रगती)
आयर्लंड
ऑस्ट्रिया
पोर्तुगाल
सिंगापूर
फिनलंड
जपान
भारताची स्थिती काय? शेजारील देशांची आणि अमेरिकेची कामगिरी
या जागतिक क्रमवारीत भारताचे स्थान 127 वे आहे, तर शेजारील देशांमध्ये भूतान 16 व्या क्रमांकासह दक्षिण आशियात सर्वात सुरक्षित ठरला आहे. दुसरीकडे पाकिस्तानचा क्रमांक 152 वा आहे. जागतिक महासत्ता असलेली अमेरिका भारताच्याही मागे म्हणजेच 134 व्या स्थानावर फेकली गेली आहे. दुसरीकडे, रशियाची स्थिती अतिशय खालावली असून त्याचे स्थान सीरिया आणि अफगाणिस्तानच्याही खाली गेले आहे. रशियासोबतच सुदान, डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो, युक्रेन आणि इस्रायल हे जगातील सर्वात असुरक्षित 5 देश ठरले आहेत, तर इराण 144 व्या स्थानावर आहे.
हेही वाचा – Pakistan-Afghanistan Conflict: पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर हवाई हल्ला; 11 लहान मुलांसह 13 नागरिकांचा मृत्यू
युरोपमध्ये शांतता, तर आशिया-आफ्रिकेत तणाव
भौगोलिक रचनेचा विचार करता पश्चिम आणि मध्य युरोप हा जगातील सर्वात शांततापूर्ण प्रदेश म्हणून कायम आहे. याउलट, पश्चिम आशिया आणि उत्तर आफ्रिकेमध्ये सर्वाधिक अशांतता नोंदवली गेली आहे. जागतिक लोकसंख्येच्या 99.7 टक्के भागाचा समावेश असलेल्या या 'ग्लोबल पीस इंडेक्स'ची ही 20 वी आवृत्ती आहे. हा निर्देशांक मोजण्यासाठी सामाजिक सुरक्षा, अंतर्गत व आंतरराष्ट्रीय संघर्षाची व्याप्ती आणि लष्करीकरण यासारख्या 23 प्रमुख निर्देशकांचा वापर केला जातो. दरम्यान, पर्यटनाचे नियोजन करताना या यादीसोबतच परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या तात्कालिक सूचनांचा आधार घेणे आवश्यक असल्याचेही यात सुचवण्यात आले आहे.