Pandharpur Wari: लंडनहून विठ्ठलनामाचा जयघोष! 11 देशांचा प्रवास करत जगातील पहिली ‘ग्लोबल दिंडी’ पंढरपूरकडे रवाना

लंडनहून निघालेली जगातील पहिली ग्लोबल दिंडी 11 देशांचा प्रवास करत आषाढी एकादशीला पंढरपूरात दाखल होणार आहे.

Pandharpur Wari: लंडनहून विठ्ठलनामाचा जयघोष! 11 देशांचा प्रवास करत जगातील पहिली ‘ग्लोबल दिंडी’ पंढरपूरकडे रवाना

आषाढी वारी म्हटलं की डोळ्यासमोर येतात टाळ-मृदुंगाचा गजर, भगव्या पताका आणि विठ्ठलनामात तल्लीन झालेले वारकरी. मात्र यंदाची वारी एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. कारण पहिल्यांदाच परदेशातून, तेही थेट लंडनमधून विठ्ठल भक्तांची दिंडी पंढरपूरच्या दिशेने रवाना झाली आहे. जगातील पहिली ‘ग्लोबल दिंडी’ म्हणून ओळख मिळवणाऱ्या या उपक्रमाने महाराष्ट्राच्या वारकरी परंपरेला आंतरराष्ट्रीय स्वरूप मिळवून दिले आहे.

6 जून रोजी इंग्लंडमधील विंडसर परिसरातून या दिंडीचे उत्साहात प्रस्थान झाले. परदेशात वास्तव्यास असलेल्या मराठी बांधवांनी पारंपरिक वारीचा अनुभव जगभर पोहोचवण्याच्या उद्देशाने हा अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. भगव्या पताका, पालखी, टाळ-मृदुंग आणि विठ्ठलनामाच्या गजरात दिंडीचा प्रवास सुरू झाला असून याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा: Shivaji Maharaj Statue in Israel : इस्रायलमध्ये उभारला जाणार छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा; वाणिज्य दूतांची ऐतिहासिक घोषणा

या दिंडीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तिचा आंतरराष्ट्रीय प्रवास. इंग्लंडपासून सुरू झालेली ही वारी नेदरलँड, बेल्जियम, फ्रान्स, लक्झेंबर्ग, जर्मनी, पोलंड, झेक रिपब्लिक, हंगेरी, तुर्की आणि जॉर्जिया अशा 11 देशांतून प्रवास करणार आहे. त्यानंतर भारतात दाखल होऊन आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूर गाठणार आहे.

सुमारे 50 दिवसांचा हा प्रवास असणार असून विविध देशांमध्ये मराठी समाजाकडून दिंडीचे स्वागत केले जाणार आहे. प्रत्येक ठिकाणी विठ्ठलभक्त एकत्र येऊन भजन, कीर्तन आणि नामस्मरणाचे कार्यक्रम आयोजित करणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील वारीची परंपरा जागतिक स्तरावर पोहोचण्यास मदत होणार आहे.

या उपक्रमामागे विठ्ठल भक्त अनिल खेडकर यांची संकल्पना असल्याचे सांगितले जात आहे. परदेशात राहणाऱ्या मराठी कुटुंबांना वारकरी परंपरेशी जोडण्याचा प्रयत्न म्हणून या दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. दिंडीच्या प्रस्थानावेळी मोठ्या संख्येने मराठी नागरिक सहभागी झाले होते. ढोल-ताशांच्या गजरात आणि विठ्ठलनामाच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.

विशेष म्हणजे, या सोहळ्यात शंभर ढोल-ताशांच्या सहभागामुळे एक वेगळाच उत्साह पाहायला मिळाला. या कार्यक्रमाची नोंद विशेष विक्रम म्हणूनही करण्यात आल्याची चर्चा आहे. त्यामुळे हा उपक्रम केवळ धार्मिकच नव्हे तर सांस्कृतिकदृष्ट्याही महत्त्वाचा ठरत आहे.

हेही वाचा: Kedarnath Yatra 2026: बाबा केदारांच्या भक्तांसाठी गूड न्यूज! हवामान सुधारताच 10,000 भाविकांसह केदारनाथ यात्रा पुन्हा सुरू

दरम्यान, महाराष्ट्रातही पारंपरिक आषाढी वारीची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा 8 जुलै रोजी आळंदीतून पंढरपूरकडे मार्गस्थ होणार आहे. लाखो वारकरी या सोहळ्यात सहभागी होणार असून राज्यभरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.

यंदाची आषाढी वारी एका नव्या इतिहासाची साक्षीदार ठरणार आहे. कारण महाराष्ट्राची वारकरी परंपरा आता केवळ राज्यापुरती मर्यादित न राहता जगभरातील मराठी मनांना एकत्र आणणारा सांस्कृतिक सेतू बनत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number