मुंबई: सध्या देशभरात ऋतूचक्राचा एक विचित्र खेळ पाहायला मिळत आहे. कडाक्याची थंडी अनुभवण्याऐवजी नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत. हवामानाच्या या लहरीपणामुळे फेब्रुवारी महिन्यातच मे महिन्यातील उन्हाच्या झळा बसू लागल्या आहेत. विशेषतः कोकण पट्ट्यात आणि मुंबईत थंडी गायब होऊन घामाच्या धारा लागल्या आहेत. हवामान विभागाच्या माहितीनुसार, वाऱ्याच्या बदललेल्या दिशेमुळे हा हवापालट झाला आहे. राजस्थान आणि पंजाबकडून येणारे उष्ण वारे आणि दक्षिण-पूर्वेकडून सुटलेल्या वाऱ्यांमुळे तापमानात लक्षणीय वाढ झाली असून, हिवाळ्याचा मुक्काम दरवर्षी कमी होत चालल्याचे हे स्पष्ट संकेत आहेत.
पुणे, सातारा, सांगली आणि सोलापूर यांसारख्या पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये 'सकाळी गुलाबी थंडी आणि दुपारी कडक ऊन' अशी दुहेरी हवामान स्थिती अनुभवयास मिळत आहे. पहाटेच्या वेळी काहीसा गारवा सुखावह वाटत असला तरी, जसजसा दिवस वर येतो, तसा उन्हाचा पारा चढत जातो. या भागांमध्ये कमाल तापमान 32 ते 34 अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता असून, कालच्या तुलनेत आज उष्णतेची तीव्रता अधिक जाणवेल. डोंगराळ भागात सक्रिय असलेल्या 'वेस्टर्न डिस्टर्बन्स'मुळे (पश्चिमी विक्षोभ) राजस्थान आणि पंजाबच्या वर चक्राकार वारे वाहत असल्याने हा परिणाम दिसून येत आहे.
हेही वाचा: Thane : बारावीच्या पहिल्याच पेपरला जाताना काळाचा घाला, डोंबिवलीतील सोहम कटरेचा लोकलमधून पडून मृत्यू
मुंबई आणि उपनगरांच्या तापमानाचा विचार करता, मुंबईकरांसाठी पुढील काही दिवस आव्हानात्मक असणार आहेत. शहरात पहाटेचा गारवा आता दुर्मिळ झाला असून दुपारच्या वेळी अंगाची लाहीलाही करणारा उकाडा जाणवत आहे. हवामान कोरडे आणि निरभ्र राहणार असले तरी, सूर्याचा प्रकोप वाढणार आहे. मुंबईचे कमाल तापमान 32 ते 35 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 23 ते 25 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे फेब्रुवारीच्या मध्यातच पंखे आणि एसीचा वापर वाढला असून, दुपारच्या वेळी बाहेर पडताना काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे.
एकीकडे उन्हाचा तडाखा वाढत असतानाच, दुसरीकडे हवामान खात्याने वर्तवलेला अंदाज बळीराजाच्या चिंतेत भर घालणारा आहे. उत्तर भारतात थंडी ओसरली असली तरी, सलग येणाऱ्या 'वेस्टर्न डिस्टर्बन्स'मुळे हवामानात मोठे बदल होणार आहेत. अरबी समुद्रातून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे 17 आणि 18 फेब्रुवारीला हरियाणा, दिल्ली, राजस्थान, पंजाब आणि मध्य प्रदेशमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस आणि गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
या बदलत्या हवामानाचा परिणाम महाराष्ट्रावरही दिसून येणार आहे. उत्तरेकडील या हवामान प्रणालीमुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा ढगाळ वातावरण तयार होण्याची शक्यता आहे. विशेषतः 18 आणि 19 फेब्रुवारीला पावसाचा जोर उत्तर प्रदेशाच्या पूर्व भागाकडे सरकणार असला तरी, महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक पाऊसाची नोंद होऊ शकते. निसर्गाच्या या लहरीपणामुळे शेती पिकांवर आणि आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
थोडक्यात सांगायचे तर, यंदाचा उन्हाळा लवकर आणि तीव्र स्वरूपात दाखल झाला आहे. उष्णतेची ही लाट म्हणजे आगामी काळात येणाऱ्या मोठ्या वादळाचे संकेत मानले जात आहेत. त्यामुळे नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी हवामान खात्याच्या सूचनांकडे लक्ष देऊन पिकांची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे.
हेही वाचा: Whatsapp Group Scam: परताव्याचे आमिष पडले महागात; निवृत्त बँक व्यवस्थापकाची एक कोटी 10 लाखांची सायबर फसवणूक