WFH Guidelines: मध्यपूर्वेतील संघर्ष आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे उद्भवलेल्या इंधन संकटाचा सामना करण्यासाठी दिल्ली-NCR मध्ये महत्त्वाचे बदल लागू करण्यात आले आहेत. इंधन बचतीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार, दिल्ली सरकार आणि दिल्ली मेट्रोने (DMRC) सोमवार, 18 मे पासून नवीन नियमावली जारी केली आहे. यामध्ये प्रामुख्याने खासगी वाहनांचा वापर कमी करणे आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला बळकट देण्यावर भर देण्यात आला आहे. पेट्रोल, डिझेल आणि CNG च्या किमतीत प्रत्येकी 3 रुपयांची वाढ झाल्याने हे पाऊल उचलण्यात आले.
खासगी कंपन्यांना आठवड्यातून 2 दिवस ‘वर्क फ्रॉम होम’चा सल्ला
दिल्ली सरकारच्या कामगार विभागाने एक महत्त्वपूर्ण मार्गदर्शक सूचना जारी करत सर्व खासगी कंपन्या, विशेषतः IT आणि ITES क्षेत्रातील आस्थापनांना, आपल्या कर्मचाऱ्यांना आठवड्यातून किमान 2 दिवस ‘वर्क फ्रॉम होम’ देण्याची विनंती केली आहे. गर्दीच्या वेळी होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी कामाच्या वेळा विभागून (Staggered shifts) लागू करण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. याव्यतिरिक्त, कर्मचाऱ्यांनी वैयक्तिक वाहनांऐवजी कारपूलिंग किंवा सार्वजनिक वाहतुकीचा वापर करावा, असे आवाहन सरकारने केले आहे. तथापि, रुग्णालय, वीज आणि पाणी पुरवठा यांसारख्या अत्यावश्यक सेवांना यातून वगळण्यात आले आहे.
हेही वाचा – Gold Silver Rate Today: सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; जाणून घ्या मुंबई, पुणे आणि दिल्लीतील आजचे ताजे दर
मेट्रोच्या फेऱ्यांमध्ये वाढ आणि सुरक्षित प्रवासाचे नियोजन
वाढती प्रवासी संख्या लक्षात घेता, दिल्ली मेट्रोने (DMRC) आपल्या ताफ्यात 6 अतिरिक्त गाड्या समाविष्ट केल्या आहेत. या नवीन नियोजनानुसार, मेट्रो आता दर सोमवारी 24 अतिरिक्त फेऱ्या पूर्ण करेल. DMRC चे प्रधान कार्यकारी संचालक अनुज दयाल यांच्या माहितीनुसार, या उपक्रमामुळे प्रवाशांची सोय होईल आणि इंधन बचतीच्या राष्ट्रीय मोहिमेत मोठे योगदान मिळेल. प्रवाशांच्या प्रतिसादानुसार इतर दिवशीही या फेऱ्यांची संख्या वाढवण्याबाबत विचार केला जाईल.
DELHI METRO TO RUN EXTRA TRAIN TRIPS TO ENCOURAGE MORE PEOPLE TO USE METRO THAN PRIVATE VEHICLES Recognizing the critical role of mass transit in ensuring energy security, economic resilience, and environmental sustainability in the extant scenario, DMRC is undertaking a series… — Delhi Metro Rail Corporation (@OfficialDMRC) May 17, 2026
DTC ची कनेक्टिव्हिटी आणि सेंट्रल व्हिस्टा परिसरात हायड्रोजन बसेस
मेट्रो प्रवाशांच्या शेवटच्या मैलापर्यंतच्या प्रवासासाठी (Last mile connectivity) DTC कडून विशेष नियोजन करण्यात आले आहे. DTC च्या सुमारे 1,500 ‘DEVi’ बसेसचा ताफा दिल्लीतील 52 प्रमुख मेट्रो स्थानकांवर तैनात असेल. तसेच, पर्यावरणाचे रक्षण आणि इंधन बचतीसाठी DMRC ने इंडियन ऑईलच्या (IOCL) सहकार्याने सेंट्रल व्हिस्टा परिसरात अत्याधुनिक हायड्रोजन-आधारित बस सेवा सुरू केली आहे. गेल्या 3 दिवसांत इंधनाच्या दरात 3 रुपयांची वाढ झाल्यामुळे, देशाचे परकीय चलन वाचवण्यासाठी देशांतर्गत इंधन वापर कमी करण्यावर सरकारचा मुख्य भर आहे.