NEET Paper Leak Update: देशभरात खळबळ माजवणाऱ्या NEET UG 2026 पेपरफुटी प्रकरणात आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. सुरुवातीला या प्रकरणाचे धागेदोरे राजस्थानशी संबंधित असल्याचे मानले जात होते. मात्र तपास यंत्रणांच्या ताज्या अहवालानुसार, हा पेपर राजस्थानमधून नव्हे, तर महाराष्ट्रातून फुटल्याचा प्राथमिक निष्कर्ष काढण्यात आला आहे. या खुलाशानंतर महाराष्ट्रातील अनेक संशयितांची कसून चौकशी सुरू झाली असून, शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
CBI कडून विशेष पथकाची स्थापना; तपासाला वेग
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता केंद्र सरकारने हा तपास आता केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (CBI) सोपवला आहे. सीबीआय लवकरच याप्रकरणी रीतसर गुन्हा दाखल करून एका विशेष पथकाची (Special Team) स्थापना करणार आहे. हे पथक 'स्पेशल ऑपरेशन्स ग्रुप' (SOG) आणि 'नॅशनल टेस्टिंग एजन्सी' (NTA) कडून सर्व फाईल्स आणि आवश्यक कागदपत्रे ताब्यात घेणार आहे. महाराष्ट्रातील कनेक्शन समोर आल्यामुळे आता तपासाची व्याप्ती वाढवण्यात आली आहे.
3 मे रोजी झालेली परीक्षा रद्द; फेरपरीक्षेचा निर्णय
नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) 3 मे 2026 रोजी झालेली NEET UG परीक्षा अधिकृतपणे रद्द केली आहे. तपास यंत्रणांचे अहवाल आणि परीक्षा प्रक्रियेतील पारदर्शकतेवर निर्माण झालेले प्रश्नचिन्ह पाहता, ही परीक्षा पुन्हा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांचा व्यवस्थेवरील विश्वास कायम ठेवण्यासाठी फेरपरीक्षा अनिवार्य असल्याचे एजन्सीने स्पष्ट केले आहे. नवीन परीक्षेच्या तारखा आणि प्रवेशपत्रे (Admit Cards) लवकरच अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केली जातील.
विद्यार्थ्यांना मोठा दिलासा: पुन्हा नोंदणी किंवा शुल्क नाही
फेरपरीक्षेमुळे विद्यार्थ्यांना होणाऱ्या त्रासाबद्दल NTA ने दिलगिरी व्यक्त केली आहे. मात्र, विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी महत्त्वाचे स्पष्टीकरण दिले आहे की, मे 2026 सत्रासाठी केलेली नोंदणी आणि उमेदवारांचा डेटा फेरपरीक्षेसाठी वैध राहील. विद्यार्थ्यांना पुन्हा नव्याने नोंदणी करण्याची गरज नाही. कोणतेही अतिरिक्त परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही. तसेच आधीचे शुल्क परत केले जाईल. तसेच निवडलेली परीक्षा केंद्रे देखील कायम राहण्याची शक्यता आहे.
अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन
केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे की, तपास यंत्रणांना NTA कडून पूर्ण सहकार्य केले जात आहे. दरम्यान, विद्यार्थी आणि पालकांनी सोशल मीडियावर पसरणाऱ्या कोणत्याही असत्य बातम्यांवर विश्वास ठेवू नये. केवळ अधिकृत माध्यमांद्वारे प्रसिद्ध होणाऱ्या माहितीनुसारच पुढील नियोजन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.