Mark Zuckerberg Apology : मेटाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) मार्क झुकरबर्ग यांनी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील बाल लैंगिक शोषणाशी संबंधित मजकूर (CSAM), डीपफेक कंटेन्ट आणि तांत्रिक त्रुटींबाबत अधिकृतपणे माफी मागितली आहे. प्राप्त माहितीनुसार, भारत सरकारने मेटाला स्पष्ट बजावले आहे की, मजकूर कोणाला दाखवायचा हे कंपनी स्वतः ठरवत असल्याने त्यांना 'मध्यस्थ' मानता येणार नाही. त्यामुळे आयटी कायद्यांतर्गत मिळणारे 'सेफ हार्बर' हे कायदेशीर संरक्षणाचे कवच त्यांना लागू होत नाही. विशिष्ट प्रकारचा मजकूर पसरवण्यासाठी मोठा निधी खर्च केला गेल्याचे मान्य करत झुकरबर्ग यांनी या घटनेबद्दल तीव्र खेद व्यक्त केला.
संसदीय समितीचा 3 दिवसांचा अल्टिमेटम अन् पाठपुरावा
फेसबुकवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा व्हिडिओ हटवल्याप्रकरणी बिनशर्त माफी मागण्यासाठी संसदीय स्थायी समितीने मेटा प्रमुखांना ३ दिवसांची कडक मुदत दिली होती. या ३ दिवसांच्या अल्टिमेटमच्या पार्श्वभूमीवर झुकरबर्ग यांनी सीएसएएम, डीपफेक आणि कामकाजातील त्रुटींबद्दल माफी मागितली. याशिवाय, महिलांचा अवमान करणारा आणि लहान मुलांशी संबंधित आक्षेपार्ह मजकूर पसरवणाऱ्या प्लॅटफॉर्म्सवर कठोर कारवाई करण्याची मागणीही संसदीय समितीने रेटून धरली होती.
आयटी मंत्रालय व मेटाच्या जागतिक टीमची उच्चस्तरीय बैठक
पंतप्रधान मोदींनी पेपर लीकच्या गंभीर मुद्द्यावर देशातील तरुणांना उद्देशून दिलेला व्हिडिओ संदेश फेसबुकने अचानक हटवल्यानंतर मोठा राजकीय व सामाजिक गदारोळ झाला होता. यानंतर केंद्र सरकारने तातडीने मेटाच्या अधिकाऱ्यांना पाचारण केले. बुधवारी मेटाच्या जागतिक प्रतिनिधी मंडळाने आयटी मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली. या उच्चस्तरीय बैठकीत व्हीआयपी पोस्टवर चुकीच्या पद्धतीने केलेली कारवाई, बाल लैंगिक शोषण (CSAM) रोखण्यातील अपयश आणि इतर महत्त्वाच्या नियामक मुद्यांवर सखोल चर्चा झाली.
पंतप्रधानांच्या 'त्या' व्हिडिओवरून का पेटला होता वाद?
नीट (NEET) पेपरफुटीच्या निषेधार्थ दिल्लीतील जंतरमंतरवर तीव्र निदर्शने झाली होती. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी तरुणांना आश्वस्त करण्यासाठी आणि दोषींवर कठोर कारवाईचे आश्वासन देणारा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता. इन्स्टाग्रामवर या व्हिडिओने 24 तासांत सर्वाधिक व्ह्यूज मिळवून सर्व जुने विक्रम मोडीत काढले. मात्र, फेसबुकने हा व्हिडिओ प्लॅटफॉर्मवरून हटवल्याने मोठा संताप व्यक्त झाला. गदारोळ वाढल्यानंतर, 'हा व्हिडिओ चुकीने हटवला गेला होता आणि तो पुन्हा रिस्टोअर करण्यात आला आहे,' असे स्पष्टीकरण मेटाच्या प्रवक्त्याने दिले.