War Impact on Medical Facilities : आरोग्यक्षेत्रालाही युद्धाचा विळखा; आपत्कालीन सेवांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी रुग्णालयांची कसरत, काय उपाययोजना करणार प्रशासन?

त्यामुळे भारतातील एमआरआय तपासणी, रुग्णालय सेवा आणि मेडिकल टुरिझम क्षेत्रावरही अप्रत्यक्ष दबाव वाढण्याची शक्यता आहे.

War Impact on Medical Facilities : आरोग्यक्षेत्रालाही युद्धाचा विळखा; आपत्कालीन सेवांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी रुग्णालयांची कसरत, काय उपाययोजना करणार प्रशासन?

नवी दिल्ली: मध्य आशियात सुरू असलेल्या संघर्षाचा परिणाम भारतात केवळ पेट्रोल-डिझेल किंवा गॅस सिलेंडरच्या किमतींपुरता मर्यादित राहणार नाही, अशी शक्यता तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. या युद्धाचा परिणाम आता हळूहळू आरोग्य क्षेत्रावरही दिसू लागण्याची चिन्हे आहेत. हजारो किलोमीटर दूर सुरू असलेला हा संघर्ष जागतिक मेडिकल सप्लाय चेन, औषधांची उपलब्धता आणि रुग्णालयांच्या सेवांवर अप्रत्यक्ष दबाव निर्माण करू शकतो. त्यामुळे भविष्यात रुग्णांना उपचारांसाठी अधिक प्रतीक्षा करावी लागेल किंवा जास्त खर्चाचा सामना करावा लागू शकतो का, हा प्रश्नही उपस्थित होत आहे.

सध्या जगभरातील आरोग्य व्यवस्था दुहेरी संकटाला सामोरी जात आहे. युद्धग्रस्त भागांमध्ये रुग्णालये जखमी आणि आजारी रुग्णांनी भरून गेली आहेत, तर इतर देशांमध्ये औषधे आणि वैद्यकीय साहित्याच्या पुरवठ्यात अडथळे निर्माण होत आहेत. दीर्घकाळ चालणाऱ्या अशा संघर्षामुळे जागतिक आरोग्य व्यवस्थेतील पुरवठा साखळीतील कमकुवत बाजूही उघड होत आहे.

आरोग्य क्षेत्रासाठी हेलियम हा वायू अत्यंत महत्त्वाचा मानला जातो, विशेषतः एमआरआय तपासणीसाठी. जगातील मोठ्या प्रमाणातील हीलियमचा पुरवठा कतारमधून होतो. जर या पुरवठ्यावर परिणाम झाला, तर एमआरआय तपासण्यांचा खर्च वाढू शकतो किंवा अशा सेवा मर्यादित होण्याची शक्यता आहे. भारतातही याचा परिणाम टप्प्याटप्प्याने दिसू शकतो.

हेही वाचा: Kerosene Distribution: रेशन कार्डवर आता मिळणार इतकं लिटर रॉकेल; गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा मोठा निर्णय

पुरवठा साखळीत अडथळे निर्माण झाल्यास कर्करोगावरील औषधे, डायलिसिससाठी लागणारे साहित्य, शस्त्रक्रियेसाठी वापरली जाणारी उपकरणे तसेच अ‍ॅनेस्थेसिया यांसारख्या महत्त्वाच्या गोष्टींची कमतरता निर्माण होऊ शकते. इंधन पुरवठ्यावर परिणाम झाल्यास रुग्णवाहिका सेवा आणि रुग्णालयांच्या जनरेटरवरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत रुग्णालयांना आपले लक्ष प्रामुख्याने आपत्कालीन सेवांकडे वळवावे लागते, ज्यामुळे मधुमेह आणि रक्तदाब यांसारख्या दीर्घकालीन आजारांच्या उपचारांमध्ये विलंब होऊ शकतो. कर्करोग उपचार आणि डायलिसिससारख्या महत्त्वाच्या सेवांवरही त्याचा परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

याशिवाय भारताच्या वैद्यकीय पर्यटन क्षेत्रावरही याचा परिणाम दिसू लागला आहे. भारत हा जगातील महत्त्वाचा मेडिकल टुरिझम हब मानला जातो; मात्र सध्याच्या परिस्थितीत पश्चिम आशियातून येणाऱ्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे. हवाई क्षेत्रातील निर्बंध आणि उड्डाणे रद्द झाल्यामुळे या भागातून येणाऱ्या रुग्णांमध्ये सुमारे 50 ते 75 टक्क्यांची घट झाल्याचे सांगितले जात आहे. परिणामी काही रुग्णालयांच्या उत्पन्नात 15 ते 20 टक्क्यांपर्यंत घट झाल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.

युद्धाचा परिणाम ऊर्जा पुरवठ्यावर झाला तर रुग्णालयांच्या वीज पुरवठ्यालाही फटका बसू शकतो. इंधन टंचाईमुळे जनरेटर आणि बॅकअप प्रणाली चालवण्याचा खर्च वाढण्याची शक्यता आहे. वेंटिलेटर आणि इतर लाइफ सपोर्ट प्रणाली पूर्णपणे विजेवर अवलंबून असल्याने ही परिस्थिती आरोग्य व्यवस्थेसाठी गंभीर ठरू शकते.

तज्ज्ञांच्या मते, संघर्ष दीर्घकाळ चालू राहिल्यास त्याचे परिणाम अधिक व्यापक स्वरूपात दिसू शकतात. भारताने कोविड-19 च्या दुसऱ्या लाटेदरम्यान ऑक्सिजन टंचाईचा गंभीर अनुभव घेतला होता. सध्याची परिस्थिती त्यापेक्षा वेगळी असली तरी पुरवठा साखळी विस्कळीत झाल्यास आरोग्य सेवांवर दबाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या रुग्णालयांकडून याबाबत अधिकृत प्रतिक्रिया दिली जात नसली, तरी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात असल्याचे संकेत मिळत आहेत. 

हेही वाचा: Earth Hour: साजरा होणार 'अर्थ अव्हर', सगळ्या लाइट्स होणार बंद, पण यामागील नेमकं कारण काय

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number