PM Narendra Modi: भारतीय राजकारणाच्या क्षितिजावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आणखी एक सुवर्णक्षण अंकित केला आहे. 'सरकार प्रमुख' (Head of Government) म्हणून सर्वाधिक काळ सेवा बजावण्याचा नवा विक्रम मोदींनी आपल्या नावे केला आहे. त्यांनी मुख्यमंत्री आणि पंतप्रधान अशा दोन्ही पदांचा मिळून एकूण 8,931 दिवसांचा कार्यकाळ पूर्ण केला असून, भारतीय लोकशाहीच्या इतिहासात दीर्घकाळ सत्ता सांभाळणारे ते पहिले नेते ठरले आहेत.
पवन कुमार चामलिंग यांचा विक्रम मोडला
या ऐतिहासिक टप्प्यासह पंतप्रधान मोदींनी सिक्कीमचे माजी मुख्यमंत्री पवन कुमार चामलिंग यांचा विक्रम मागे टाकला आहे. चामलिंग यांनी मुख्यमंत्री म्हणून 8,930 दिवस पद भूषवले होते. मोदींच्या या प्रवासाची सुरुवात 7 ऑक्टोबर 2001 रोजी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून झाली होती. त्यानंतर 2014 पासून देशाचे पंतप्रधान म्हणून सलग तिसऱ्या कार्यकाळात त्यांनी हा टप्पा गाठला आहे. विशेष म्हणजे, चामलिंग यांचा विक्रम केवळ एका राज्यापुरता मर्यादित होता, मात्र मोदींनी राज्य आणि केंद्र अशा दोन्ही स्तरांवर पूर्ण बहुमताची सरकारे चालवून हे यश संपादन केले आहे.
प्रशासकीय कौशल्य आणि अढळ जनविश्वास
पंतप्रधान मोदींची ही कामगिरी केवळ आकड्यांपुरती मर्यादित नसून ती त्यांच्या प्रशासकीय पकडीची साक्ष देते. स्वतंत्र भारतात जन्मलेले आणि सत्तेच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचणारे ते पहिले पंतप्रधान आहेत. तसेच, मुख्यमंत्री पदाचा 12 वर्षांहून अधिक काळ असलेला 'तळागाळातील कामाचा अनुभव' (Grassroots Experience) घेणारेही ते पहिलेच पंतप्रधान ठरले आहेत. 2014, 2019 आणि 2024 अशा सलग तीन लोकसभा निवडणुकांमध्ये विजय मिळवून त्यांनी आपली लोकप्रियता सिद्ध केली आहे.
हेही वाचा – Air India Fitness Policy: एअर इंडियाच्या विमानात आता फक्त 'फिट' कर्मचारीच दिसणार; BMI चुकला तर थेट…
विक्रमांची मालिका
या नव्या विक्रमासोबतच पंतप्रधान मोदींच्या नावावर अनेक वैशिष्ट्ये जोडली गेली आहेत. गुजरातच्या इतिहासात सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपद भूषवण्याचा मानही त्यांच्याच नावावर आहे. केंद्र आणि राज्य अशा दोन्ही आघाड्यांवर प्रदीर्घ काळ लोकशाही मार्गाने निवडून येऊन जनसेवा करण्याचा हा विक्रम भारतीय राजकारणातील एक मैलाचा दगड मानला जात आहे.