Mount Everest: जगातील सर्वात उंच पर्वत माऊंट एव्हरेस्टवर घडलेली एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तिबेटच्या उतारावर अचानक आलेल्या हिमवादळामुळे सुमारे 1000 ट्रेकर्स आणि गिर्यारोहक तिथे अडकून पडले आहेत. मुसळधार बर्फवृष्टी आणि जोरदार वाऱ्यांमुळे या भागात हालचाल पूर्णपणे ठप्प झाली आहे. अनेकांनी हायपोथर्मियासारख्या गंभीर अवस्थेला सामोरं जावं लागत असल्याची माहिती समोर आली आहे.
एव्हरेस्टचा तिबेटी उतार हा विशेषतः साहसी प्रवासासाठी प्रसिद्ध आहे. अनेक देशांतून आलेले गिर्यारोहक या भागातून एव्हरेस्ट शिखर गाठण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र, यावेळी हवामानाच्या अनपेक्षित बदलामुळे ही साहसयात्रा संकटात सापडली आहे.
हवामान खात्याने याआधी कोणतीही हिमवादळाची शक्यता वर्तवलेली नव्हती. मात्र, शुक्रवारी संध्याकाळपासून अचानक बर्फवृष्टी सुरू झाली आणि थोड्याच वेळात पूर्ण परिसर बर्फाच्या कठीण कवचात अडकला. तब्बल 16,000 फूट (4,900 मीटर) उंचीवर हा सारा प्रकार घडल्यामुळे बचाव कार्यात मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत.
स्थानिक प्रशासन आणि बचाव पथकांनी तातडीने हालचाली करत सुमारे 350 जणांना सुरक्षित स्थळी हलवले आहे. त्यांना जवळील कुदांग गावात तात्पुरत्या निवासात ठेवण्यात आले आहे. मात्र, अजूनही शेकडो ट्रेकर्स बर्फात अडकलेले असल्याचे समजते. तिबेटमधील 'ब्लू स्काय रेस्क्यू टीम'सह अनेक स्थानिक संस्था बचाव कार्यात गुंतल्या आहेत. स्थानिक ग्रामस्थांनीही शेकडोच्या संख्येने हातभार लावला आहे.
या भागात थंडी इतकी प्रचंड आहे की ट्रेकर्सचे तंबू उडून गेले असून काहींना हायपोथर्मिया झाल्याची माहिती समोर आली आहे. काहीजण श्वास घेण्यास त्रास होतोय, तर काहींना ताप आणि अशक्तपणामुळे हालचालही करता येत नाहीये.
हेही वाचा: Oil Production: रशियासह 22 देशांचा मोठा निर्णय! भारतावर होणार थेट परिणाम
नेपाळच्या सीमेजवळील भागांमध्ये देखील पावसामुळे पूर आणि भूस्खलनाचे प्रकार घडत आहेत. ताज्या माहितीप्रमाणे नेपाळमध्ये गेल्या दोन दिवसांत पूर आणि दरड कोसळल्यामुळे किमान 47 जणांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर, एव्हरेस्ट परिसरात आणखी जीवितहानी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
विशेष म्हणजे, स्थानिक मार्गदर्शकांनी सांगितलं की ऑक्टोबर महिन्यात अशा प्रकारचं हवामान यापूर्वी कधीच अनुभवलेलं नाही. अचानक आलेलं हिमवादळ हे हवामानातील बदल आणि जागतिक तापमानवाढीचे संकेत देत असल्याची शक्यताही तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.
सध्या संपूर्ण जगाचे लक्ष एव्हरेस्टच्या या संकटग्रस्त भागाकडे लागले आहे. सरकार आणि आंतरराष्ट्रीय मदत संस्थांनी तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी गिर्यारोहण समुदायातून केली जात आहे.