PM Preference Survey: देशाच्या आगामी पंतप्रधानपदाच्या शर्यतीबाबत प्रसिद्ध झालेल्या ताज्या राजकीय पाहणीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. 'इंडिया टुडे-सीव्होटर'च्या ऑगस्ट 2026 मधील 'मूड ऑफ द नेशन' या जनमत चाचणीच्या निष्कर्षानुसार, पंतप्रधानपदासाठी विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच 48.7 टक्के नागरिकांच्या पाठिंब्यासह देशाची पहिली पसंती ठरले आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी 27.1 टक्के लोकांची पसंती मिळवत दुसऱ्या स्थानावर आहेत. मात्र, या सर्व्हेतील सर्वात थक्क करणारी बाब म्हणजे तामिळनाडूचे नवे मुख्यमंत्री आणि 'तमिळगा वेत्री कळगम' (TVK) पक्षाचे सर्वेसर्वा सी. जोसेफ विजय यांनी थेट 9.2 टक्के पाठिंबा मिळवत या यादीत तिसरा क्रमांक पटकवला आहे. 2024 मध्येच राजकारणात प्रवेश करणाऱ्या नेत्याचा हा आलेख थक्क करणारा मानला जात आहे.
विरोधी आघाडीच्या नेतृत्वातही बड्या दिग्गजांना पछाडले
केवळ पंतप्रधानपदाच्या पसंतीतच नव्हे, तर भारतीय जनता पक्षाविरोधी आघाडीच्या संभाव्य नेतृत्वाच्या शर्यतीतही विजय यांनी आपल्या लोकप्रियतेची ताकद दाखवून दिली आहे. विरोधी पक्षांचे नेतृत्व कोणी करावे, या प्रश्नावर राहुल गांधी 29 टक्के पसंतीसह प्रथम स्थानी असले, तरी तब्बल 12.2 टक्के लोकांनी विजय यांच्या नावाला पसंती दिली आहे. या शर्यतीत त्यांनी अरविंद केजरीवाल, ममता बॅनर्जी आणि अखिलेश यादव यांच्यासारख्या अनेक वर्षांचा राजकीय अनुभव असलेल्या वरिष्ठ नेत्यांना मागे टाकले आहे.
2029 च्या शर्यतीवरून टीव्हीके आणि काँग्रेसमध्ये जुंपण्याची शक्यता
तामिळनाडूच्या सत्ताकारणात दणदणीत विजय मिळवून मुख्यमंत्री बनलेल्या विजय यांच्या या नव्या राष्ट्रीय लोकप्रियतेमुळे त्यांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. थुथुकुडीसह राज्यातील अनेक शहरांमध्ये टीव्हीके कार्यकर्त्यांनी विजय यांचा 'भावी पंतप्रधान' असा उल्लेख असलेले फलक झळकवले आहेत. पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी विजय यांना 2029 च्या सार्वत्रिक निवडणुकीत विरोधी आघाडीचा पंतप्रधानपदाचा चेहरा बनवण्याची मागणी लावून धरली आहे.
काँग्रेससाठी चिंतेची बाब?
दरम्यान, टीव्हीकेच्या या भूमिकेमुळे काँग्रेस पक्षाच्या गोटात अस्वस्थता निर्माण होण्याची चिन्हे आहेत. 2029 मध्ये राहुल गांधी हेच विरोधी पक्षांचे मुख्य दावेदार असतील अशी स्पष्ट भूमिका काँग्रेसने घेतलेली असताना, दाक्षिणात्य मित्राकडूनच मिळालेले हे आव्हान राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे मानले जात आहे. काँग्रेस नेत्यांनी यावर पलटवार करताना टीव्हीके अजूनही एका राजकीय पक्षापेक्षा स्टारच्या फॅन क्लबसारखाच वागत असल्याची टीका केली आहे.