Female Cheetah Jwala gave Birth to 5 cubs in Kuno National Park : मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कधून वन्यजीव प्रेमींसाठी एक अत्यंत सुखद बातमी समोर आली आहे. नामीबियातून आणलेल्या ‘ज्वाला’ नावाच्या मादी चित्त्याने सोमवारी (9 मार्च 2026) पाच गोंडस पिल्लांना जन्म दिला आहे. या नवीन पाहुण्यांच्या आगमनामुळे भारतातील चित्त्यांच्या एकूण संख्येने आता पन्नासचा टप्पा ओलांडला असून, ही संख्या आता 53 वर पोहोचली आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी सोशल मीडियाद्वारे ही आनंदाची बातमी शेअर केली आहे.
ज्वालाची तिसऱ्यांदा प्रसूती आणि ‘प्रोजेक्ट चित्ता’चा गौरव
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी ‘प्रोजेक्ट चित्ता’साठी हा ऐतिहासिक क्षण मानला जात आहे. ‘ज्वाला’ ही नामीबियातून 2022 मध्ये भारतात आणलेल्या चित्त्यांपैकी एक आहे. विशेष म्हणजे, ज्वाला तिसऱ्यांदा आई बनली असून तिने आज 5 शावकांना जन्म दिला आहे. यासह भारतात जन्मलेल्या चित्त्याच्या बछड्यांची एकूण संख्या आता 33 झाली आहे. काही दिवसांपूर्वीच ‘गामिनी’ नावाच्या मादी चित्त्याने 4 शावकांना जन्म दिला होता, त्यानंतर आता ज्वालाने दिलेल्या या योगदानामुळे वन्यजीव संवर्धनाच्या मोहिमेला मोठे बळ मिळाले आहे.
कुनोचे वातावरण चित्त्यांसाठी ठरतेय पोषक
वन्यजीव तज्ज्ञांच्या मते, चित्त्यांची वाढती संख्या हे संकेत देते की, हे परदेशी प्राणी आता कुनो नॅशनल पार्कच्या वातावरणाशी पूर्णपणे जुळवून घेत आहेत. येथील गवताळ प्रदेश, जंगल आणि शिकारीसाठी उपलब्ध असलेले चितळ व चिंकारा यांसारखे प्राणी चित्त्यांच्या प्रजननासाठी अनुकूल ठरत आहेत. सुरुवातीच्या काळात काही चित्त्यांचा मृत्यू झाल्यामुळे या प्रकल्पासमोर आव्हाने उभी राहिली होती, मात्र, गेल्या 2 वर्षांतील शावकांचा जन्मदर पाहता हा प्रकल्प आता स्थिर होत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
अहोरात्र मेहनत घेणाऱ्या टीमचे यश
या यशाचे श्रेय भूपेंद्र यादव यांनी वनविभागाचे डॉक्टर, क्षेत्रीय कर्मचारी आणि विशेष देखरेख ठेवणाऱ्या पथकाला दिले आहे. चित्त्यांचा मागोवा घेणे, त्यांच्या आरोग्याची तपासणी करणे आणि सुरक्षित प्रजननासाठी वातावरण तयार करणे यासाठी ही टीम 24 तास कार्यरत असते. वनविभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, चित्त्यांच्या संख्येने 50 चा आकडा पार करणे हा भारताच्या चित्ता संवर्धन प्रवासातील एक मैलाचा दगड आहे. आगामी काळात या लहान शावकांच्या आरोग्यावर विशेष लक्ष दिले जाणार आहे.
Cheetahs cross half-century ? A moment of great pride for Project Cheetah as Jwala, the Namibian Cheetah and a successful third-time mother, gave birth to five cubs today at the Kuno National Park. With this birth, the number of Indian-born thriving cubs has risen to 33,… pic.twitter.com/tzxYYmLPtM — Bhupender Yadav (@byadavbjp) March 9, 2026
भारतातील चित्त्यांची सद्यस्थिती
भारतात आता एकूण 53 चित्ते असून, यामध्ये दक्षिण आफ्रिका आणि नामीबियातून आणलेले प्रौढ चित्ते तसेच भारतात जन्मलेल्या शावकांचा समावेश आहे. ज्वालाने यापूर्वीही कुनोमधील चित्त्यांची संख्या वाढवण्यात मोलाची भूमिका बजावली आहे. भारतातील चित्त्यांची ही यशोगाथा आता जागतिक स्तरावर वन्यजीव संवर्धनाचा एक आदर्श वस्तुपाठ ठरत आहे. ज्वाला आणि तिची शावके सुदृढ राहावीत आणि भारताची ही ‘चित्ता कथा’ नव्या उंचीवर जावी, अशा शुभेच्छा पर्यावरण मंत्र्यांनी व्यक्त केल्या आहेत.