Bharat Bandh : केंद्रीय कामगार संघटना आणि शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या देशव्यापी संपामुळे उद्या, बुधवार, 12 फेब्रुवारी 2026 रोजी 'भारत बंद' पाळला जाणार आहे. या संपामुळे देशभरातील सार्वजनिक क्षेत्रातील बँका, सरकारी कार्यालये, वाहतूक सेवा आणि बाजारपेठांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. संयुक्त किसान मोर्चा (SKM) आणि अखिल भारतीय किसान सभा (AIKS) यांसारख्या मोठ्या शेतकरी संघटनांनी या संपाला पूर्ण पाठिंबा दिला असून, विविध राज्यांमध्ये निदर्शने केली जाणार आहेत.
का पुकारण्यात आला आहे देशव्यापी संप?
केंद्र सरकारने गेल्या वर्षी 29 कामगार कायद्यांच्या जागी लागू केलेल्या चार नवीन कामगार संहितांविरुद्ध (Labor Codes) कामगार संघटनांनी हा एल्गार पुकारला आहे. संघटनांच्या मते, या नवीन संहितांमुळे कामगारांचे हक्क कमकुवत होणार असून नोकरीची सुरक्षितता धोक्यात येणार आहे. याव्यतिरिक्त, खासगीकरण, वेतनातील तफावत, वीज दुरुस्ती विधेयक, बियाणे विधेयकाचा मसुदा आणि 'पीस' (PEACE) कायदा रद्द करावा, अशा प्रमुख मागण्या या संपाच्या माध्यमातून करण्यात येत आहेत. तसेच मनरेगा योजना पुनर्संचयित करण्याची मागणीही लावून धरण्यात आली आहे.
बँकिंग सेवांवर संपाचे सावट; ग्राहकांची गैरसोय होण्याची चिन्हे
ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन (AIBEA) सह प्रमुख बँक संघटनांनी या संपात सहभागी होण्याचा निर्णय घेतल्याने सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे कामकाज विस्कळीत होऊ शकते. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) आणि आयडीबीआय (IDBI) सारख्या बँकांनी आपल्या ग्राहकांना संभाव्य व्यत्ययाबाबत आधीच कल्पना दिली आहे. जरी बँकांनी अधिकृत सुट्टी जाहीर केलेली नसली, तरी कर्मचारी संपावर असल्याने चेक क्लिअरन्स, रोख रक्कम भरणे आणि काढणे या सेवांवर परिणाम होऊ शकतो. मात्र, ऑनलाइन बँकिंग आणि एटीएम सेवा सुरू राहण्याची शक्यता आहे.
हेही वाचा - Bank Strike News: मोठी बातमी, अन्यथा होईल मनस्ताप! बँकेचे काम उद्यावर ढकलताय; कारण काय ?
शाळा-महाविद्यालये आणि बाजारपेठांची स्थिती
शिक्षण संस्थांबाबत केंद्र सरकारने कोणताही अधिकृत सुट्टीचा आदेश दिलेला नाही. परंतु, केरळ, कर्नाटक आणि ओडिशामध्ये स्थानिक संघटनांच्या पाठिंब्यामुळे शाळा-महाविद्यालये बंद राहू शकतात. महाराष्ट्रातही वाहतूक विस्कळीत झाल्यास स्थानिक प्रशासन सुट्टीबाबत निर्णय घेऊ शकते, त्यामुळे पालकांनी शाळांच्या सूचनांकडे लक्ष द्यावे. तसेच, अनेक शहरांमध्ये व्यापारी संघटनांनी संपाला पाठिंबा दिल्यास बाजारपेठा बंद राहू शकतात. रस्ते अडवल्यामुळे (चक्का जाम) प्रवाशांना प्रवासासाठी अडचणी येण्याची शक्यता आहे.
अत्यावश्यक सेवा सुरू राहणार
भारत बंद दरम्यान रुग्णालये, रुग्णवाहिका, औषधांची दुकाने आणि अग्निशमन दल यांसारख्या आपत्कालीन सेवांना संपातून वगळण्यात आले आहे. विमानतळ आणि रेल्वे सेवा सुरू राहतील, मात्र रेल्वे स्थानक किंवा विमानतळावर पोहोचण्यासाठी प्रवाशांना वाहतुकीच्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे प्रवाशांनी वेळेआधीच घरून बाहेर पडण्याचा सल्ला देण्यात आला आहे.