Bihar Election Result 2025: बिहार विधानसभा निवडणुकीतील प्रचंड विजयाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आपली पहिली प्रतिक्रिया नोंदवत विरोधकांवर जोरदार निशाणा साधला आहे. एनडीएला मिळालेल्या प्रचंड बहुमताला “विकसित बिहारवर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक नागरिकाचा विजय’’ असे संबोधत त्यांनी सांगितले की, जनता आता कामगिरीच्या आधारावरच जनादेश देते.
घुसखोरांच्या मुद्द्यावरून कडवी टीका
अमित शाह यांनी विरोधकांवर थेट हल्ला चढवताना घुसखोरीच्या मुद्द्याला पुन्हा एकदा उजाळा दिला. त्यांनी म्हटले, “बिहारच्या जनतेचे प्रत्येक मत हे घुसखोर आणि त्यांना संरक्षण देणाऱ्यांविरुद्ध मोदी सरकारच्या धोरणावर असलेल्या विश्वासाचे प्रतीक आहे. मतदानासाठी घुसखोरांना पाठबळ देणाऱ्यांना जनता योग्य उत्तर देत आहे.”
हेही वाचा - "सनातन संस्कृतीला पुढे नेणारी शक्ती.." बिहार निवडणुकीच्या निकालावर बागेश्वर धामच्या धीरेंद्र कृष्ण शास्त्रींची प्रतिक्रिया
काँग्रेसवर थेट टीका
अमित शाह यांनी काँग्रेसवरही निशाणा साधत राहुल गांधींच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांनी म्हटले, “मतदार यादी शुद्धीकरणाच्या मुद्द्यावर राजकारण करणाऱ्यांना जनता नाकारत आहे. त्यामुळेच काँग्रेस आज बिहारमध्ये शेवटच्या स्थानावर गेली आहे.”
मोदी, नितीश आणि एनडीए कार्यकर्त्यांचे अभिनंदन
एनडीएच्या विजयाला ऐतिहासिक म्हणत शाह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री नितीश कुमार आणि एनडीएच्या सर्व नेते-कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले. त्यांनी म्हटले, “हा विजय प्रत्येक बिहारीचा आहे. बूथस्तरापासून राज्यस्तरापर्यंत अथक परिश्रम करणाऱ्या कार्यकर्त्यांना मी सलाम करतो.” महिला मतदारांनाही धन्यवाद देत त्यांनी आश्वासन दिले की एनडीए सरकार विकासाच्या वचनांना आणखी वेगाने पूर्ण करणार आहे.
हेही वाचा - संजय राऊत म्हणाले,'एकदम महाराष्ट्र पॅटर्न!'; बिहारच्या निकालावर 'निवडणूक आयोग आणि भाजपचे राष्ट्रीय कार्य' म्हणत खोचक टीका
सध्याच्या कलांनुसार, एनडीए 200 पेक्षा जास्त जागांवर आघाडीवर असून स्पष्ट बहुमताकडे वाटचाल करत आहे. भाजप या निवडणुकीत आतापर्यंत 91 जागांसह सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येत असल्याचे दिसून येत आहे. जेडीयूला 83 जागा, एलजेपी (आर) 19, एचएएम 5 आणि आरएलएम 4 जागा जिंकताना दिसत आहेत.