Nitin Nabin Elected as BJP New National President : भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा सस्पेन्स अखेर संपला असून बिहारचे दिग्गज नेते नितीन नबीन यांची या पदावर बिनविरोध निवड करण्यात आली आहे. मागील अनेक महिन्यांपासून जे. पी. नड्डा यांचा वारसदार कोण असेल, यावर सुरू असलेल्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. निवडणूक अधिकारी डॉ. के. लक्ष्मण यांनी या निवडीची अधिकृत घोषणा केली असून, नितीन नबीन यांच्या समर्थनार्थ देशभरातून तब्बल 37 नामांकन अर्ज दाखल करण्यात आले होते. अवघ्या 45 व्या वर्षी या पदावर विराजमान होणारे नबीन हे भाजपाच्या इतिहासातील सर्वात तरुण राष्ट्रीय अध्यक्ष ठरले आहेत. आज, मंगळवार 20 जानेवारी 2026 रोजी सकाळी 11:30 वाजता ते रीतसर आपला पदभार स्वीकारतील.
राजकीय वारसा आणि 5 वेळा आमदारकीचा रेकॉर्ड
नितीन नबीन यांचा जन्म 23 मे 1980 रोजी बिहारची राजधानी पाटणा येथे झाला. त्यांचे वडील किशोर प्रसाद सिन्हा हे भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि बांकीपूरचे माजी आमदार होते. वडिलांच्या निधनानंतर 2006 मध्ये त्यांनी पोटनिवडणुकीद्वारे राजकारणात प्रवेश केला. तेव्हापासून ते आजपर्यंत कधीही पराभूत झालेले नाहीत. त्यांनी 2010, 2015, 2020 आणि अलीकडेच 2025 च्या विधानसभा निवडणुकीत बांकीपूर मतदारसंघातून विजय मिळवून सलग पाच वेळा आमदार होण्याचा मान मिळवला आहे. 2025 च्या निवडणुकीत त्यांनी तब्बल 98,299 मते मिळवून आपला बालेकिल्ला राखला होता.
संघटनात्मक कौशल्य आणि मंत्रिपदाचा अनुभव
नितीन नबीन यांनी केवळ निवडणूक राजकारणातच नव्हे, तर पक्ष संघटनेतही आपली क्षमता सिद्ध केली आहे. त्यांनी 'भारतीय जनता युवा मोर्चा'चे राष्ट्रीय सरचिटणीस आणि बिहार प्रदेशाध्यक्ष म्हणून मोलाची कामगिरी बजावली आहे. तसेच छत्तीसगड आणि सिक्कीमसारख्या राज्यांचे प्रभारी म्हणून त्यांनी पक्षाची पाळेमुळे घट्ट केली. प्रशासकीय पातळीवर त्यांनी बिहारच्या नितीश सरकारमध्ये बांधकाम मंत्री, नगरविकास आणि कायदा मंत्री म्हणून काम पाहिले आहे. विशेषतः छत्तीसगड विधानसभेत भाजपाला मिळवून दिलेल्या विजयामध्ये त्यांची 'को-इन्चार्ज' म्हणून महत्त्वाची भूमिका होती.
हेही वाचा - Supreme Court on Election Commission : निवडणूक आयोगाचा 'व्हॉट्सअॅप'वरून कारभार! सुप्रीम कोर्टाने ओढले ताशेरे; दिला महत्त्वाचा आदेश
जे. पी. नड्डांचा 'कित्ता' गिरवला
नितीन नबीन यांची निवड ही जे. पी. नड्डा यांच्याच पावलावर पाऊल ठेवणारी ठरली आहे. सहा वर्षांपूर्वी नड्डा यांनाही प्रथम कार्यकारी अध्यक्ष आणि नंतर पूर्णवेळ अध्यक्ष करण्यात आले होते. नबीन यांच्याबाबतही पक्षाने हाच पॅटर्न राबवला. 14 डिसेंबर 2025 रोजी त्यांची कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती झाली होती, ज्यावरून तेच भविष्यातील अध्यक्ष असतील याचा अंदाज बांधला जात होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या विश्वासातील नेत्यांपैकी एक असलेल्या नबीन यांच्याकडे आगामी विधानसभा आणि 2029 च्या लोकसभा निवडणुकांसाठी पक्षाला तयार करण्याचे मोठे आव्हान असणार आहे.
तरुण नेतृत्व आणि भविष्यातील आव्हाने
भाजपामधील या निवडीकडे 'जनरेशन शिफ्ट' (पिढीबदल) म्हणून पाहिले जात आहे. नबीन हे 'मिलेनियल' पिढीचे प्रतिनिधित्व करत असल्याने तरुण मतदारांना आकर्षित करण्यासाठी त्यांचा मोठा उपयोग होईल, असे मानले जात आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली आता तामिळनाडू, केरळ आणि आसाममध्ये होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुका पार पडतील. शिस्तबद्ध जीवनशैली आणि कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधण्याची हातोटी यामुळे नबीन यांनी अल्पकाळात राष्ट्रीय स्तरावर आपली ओळख निर्माण केली आहे. नड्डा यांच्याकडून सूत्रे हाती घेतल्यानंतर, पक्ष विस्ताराची त्यांची पुढील रणनीती काय असेल याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा - UAE President India Visit : मैत्रीचं अतुट नातं! पंतप्रधान मोदींनी प्रोटोकॉल तोडून केलं UAE च्या अध्यक्षांच स्वागत