Monday, February 09, 2026 01:31:25 PM

PM Modi On Nitin Nabin: 'नितीन नबीन आता माझे बॉस...'; भाजपच्या नवनिर्वाचित अध्यक्षांचे पंतप्रधान मोदींकडून कौतुक

भाजप मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नबीन यांचे स्वागत करताना एक मोठे विधान केले.

pm modi on nitin nabin नितीन नबीन आता माझे बॉस भाजपच्या नवनिर्वाचित अध्यक्षांचे पंतप्रधान मोदींकडून कौतुक

PM Modi On Nitin Nabin:  भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक निवडणुकीची प्रक्रिया आज पूर्ण झाली असून, नितीन नबीन यांची भाजपचे 12 वे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. वयाच्या 45 व्या वर्षी ही जबाबदारी स्वीकारणारे नबीन हे भाजपचे आतापर्यंतचे सर्वात तरुण अध्यक्ष ठरले आहेत. या ऐतिहासिक क्षणी भाजप मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नबीन यांचे स्वागत करताना एक मोठे विधान केले. "पक्षाचा कार्यकर्ता म्हणून नितीन नबीन आता माझे बॉस आहेत," असे म्हणत पंतप्रधानांनी पक्ष संघटनेचे महत्त्व अधोरेखित केले.

लोकशाही पद्धतीने निवड प्रक्रिया पूर्ण

पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले की, भाजपमध्ये अध्यक्षांची निवड ही घराणेशाहीतून नाही तर लोकशाही मार्गाने होते. "गेल्या अनेक महिन्यांपासून बूथ स्तरापासून राष्ट्रीय स्तरापर्यंत सुरू असलेल्या 'संघटन महोत्सवाची' आज सांगता झाली आहे. भाजपच्या संविधानानुसार ही प्रक्रिया पार पडली असून, नितीन नबीन यांच्या निवडीबद्दल मी त्यांचे आणि देशभरातील कार्यकर्त्यांचे अभिनंदन करतो," असे मोदींनी नमूद केले.

'नितीन नबीन माझे बॉस' : पंतप्रधानांची भावना

पंतप्रधानांनी आपल्या भाषणात संघटना आणि कार्यकर्ता यांच्यातील नात्यावर भाष्य केले. ते म्हणाले, "लोकांना वाटेल की मी तिसऱ्यांदा पंतप्रधान झालो आहे, 25 वर्षे सलग सत्तेत आहे, पण माझ्यासाठी सर्वात अभिमानाची गोष्ट म्हणजे मी भाजपचा एक कार्यकर्ता आहे. नितीन नबीन हे आपल्या सर्वांचे अध्यक्ष आहेत. मी पक्षाचा कार्यकर्ता आहे आणि ते माझे 'बॉस' आहेत. त्यांना केवळ भाजपचे व्यवस्थापनच नाही, तर एनडीएच्या मित्रपक्षांशी समन्वय राखण्याचीही मोठी जबाबदारी पार पाडायची आहे."

अनुभवाचा वारसा आणि तरुणाईचा उत्साह

नितीन नबीन यांच्या कौशल्याचा उल्लेख करताना मोदी म्हणाले, नितीन नबीन हे 'मिलेनियल' पिढीतील आहेत. त्यांनी रेडिओचा काळही पाहिला आहे आणि आज ते AI (कृत्रिम बुद्धिमत्ता) चे सक्रिय वापरकर्ते आहेत. त्यांना संघटनात्मक कामाचा दांडगा अनुभव असून त्यांनी दिलेली प्रत्येक जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली आहे. पुढील 25 वर्षे 'विकसित भारतासाठी' महत्त्वाची आहेत, या काळात नबीन यांची ऊर्जा पक्षाला नवी दिशा देईल.

हेही वाचा - Nitin Nabin : भाजप राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन यांची बिनविरोध निवड; 45 व्या वर्षी सांभाळणार जगातील सर्वात मोठ्या पक्षाची धुरा

माजी अध्यक्षांच्या कार्याचा गौरव

पंतप्रधानांनी जनसंघापासून भाजपपर्यंतच्या प्रवासाचा आढावा घेतला. अटलजी, अडवाणीजी, मुरली मनोहर जोशी यांच्या संघर्षापासून ते व्यंकय्या नायडू, नितीन गडकरी, राजनाथ सिंह, अमित शाह आणि जे.पी. नड्डा यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने गाठलेल्या शिखरांचा त्यांनी गौरव केला. "नड्डाजींच्या काळात भाजपने पंचायतीपासून संसदेपर्यंत स्वतःला अधिक मजबूत केले," असेही ते म्हणाले.

'भाजप ही केवळ राजकीय संघटना नाही, तर संस्कृती'

भाजपच्या यशाचे गमक सांगताना पंतप्रधान म्हणाले की, इतर पक्षांमध्ये सत्ता टिकवणे कठीण असते, मात्र भाजपने ती प्रवृत्ती मोडीत काढली आहे. गुजरात, मध्य प्रदेश, हरियाणा आणि ओडिशामधील विजयाचे उदाहरण देत त्यांनी सांगितले की, भाजप हा 'राष्ट्रीय आत्मा' असलेला पक्ष आहे, ज्याची मुळे मातीत खोलवर रुजलेली आहेत. म्हणूनच आज देशाच्या कानाकोपऱ्यातील तरुणांना भाजप हा सर्वात सुरक्षित आणि उत्तम राजकीय प्रवेशबिंदू वाटतो.
 


सम्बन्धित सामग्री