Leh Violence: लेह हिंसाचार प्रकरणात हवामान कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना अद्याप दिलासा मिळालेला नाही. त्यांच्या पत्नी गीतांजली अंग्मो यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार, लडाख प्रशासन आणि जोधपूर मध्यवर्ती कारागृहाच्या पोलीस अधीक्षकांना नोटीस जारी केल्या आहेत. न्यायालयाने या प्रकरणाची पुढील सुनावणी 14 ऑक्टोबर रोजी ठेवली आहे. सोनम वांगचुक यांना 26 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत (NSA) अटक करण्यात आली होती. त्यांच्यावर तरुणांना चिथावणी दिल्याचा आरोप आहे, ज्यामुळे लेहमध्ये हिंसक निदर्शने झाली होती. एनएसएअंतर्गत कोणत्याही व्यक्तीला 12 महिन्यांपर्यंत खटल्याशिवाय ताब्यात ठेवण्याची परवानगी दिली जाते.
अटकेचे कारण दिले नाही; बचाव पक्षाचा आरोप
न्यायालयाने सुनावणीदरम्यान वांगचुक यांच्या पत्नीला अटकेच्या आदेशाची प्रत देण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच तुरुंगात असलेल्या वांगचुक यांना योग्य वैद्यकीय सुविधा पुरवण्याचाही आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. गीतांजली अंग्मो यांच्या वतीने वरिष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी असा दावा केला की, वांगचुक यांच्या अटकेबाबत कुटुंबाला कोणतेही स्पष्ट कारण देण्यात आलेले नाही. यावर सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सांगितले की, अटकेचे कारण आधीच अटकेतील व्यक्तीला देण्यात आले आहे. तथापी, त्यांनी न्यायालयाला आश्वासन दिले की ते वांगचुक यांच्या पत्नीला यासंदर्भातील एक प्रत देतील.
हेही वाचा – Girnar Hill Gorakhnath Temple Vandalism: गुजरातमधील गोरखनाथ मंदिरात तोडफोड, भाविकांमध्ये संतापाची लाट
लेह हिंसाचाराची चौकशी सुरू
लडाख प्रशासनाने 24 सप्टेंबर रोजी झालेल्या लेह हिंसाचाराच्या घटनेची दंडाधिकारी चौकशी सुरू केली आहे. या घटनेत चार लोकांचा मृत्यू झाला होता. ही हिंसा लेह एपेक्स बॉडी (LAB) च्या युवा शाखेच्या नेतृत्वाखाली झालेल्या निदर्शनादरम्यान भडकली होती. या आंदोलनात लडाखला राज्याचा दर्जा आणि सहाव्या अनुसूचीत समावेश करण्याची मागणी करण्यात आली होती. अधिकाऱ्यांनी सांगितले की, चौकशीचे उद्दिष्ट म्हणजे हिंसाचाराचे मूळ कारण शोधणे, सहभागींची ओळख पटवणे आणि कायदा अंमलबजावणी संस्थांची भूमिका तपासणे आहे. तथापी, चौकशीचा अंतिम अहवाल चार आठवड्यांत सादर होण्याची अपेक्षा आहे.
दरम्यान, वांगचुक यांच्या पत्नीने असा दावा केला आहे की, त्यांना लेहमधील घरी प्रत्यक्षात नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. तसेच वांगचुक यांनी स्थापन केलेल्या हिमालयन इन्स्टिट्यूट ऑफ अल्टरनेटिव्ह्ज, लडाख (HIAL) मधील विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांना छळ, धमक्या आणि आक्रमक तपासणीचा सामना करावा लागत आहे. या सर्व घटनांमुळे लडाखमधील परिस्थिती पुन्हा एकदा तणावपूर्ण झाली असून, देशाचे लक्ष 14 ऑक्टोबरच्या सर्वोच्च न्यायालयीन सुनावणीकडे लागले आहे.