नोएडा येथील सेक्टर-44 मधील अमिटी इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकणाऱ्या यूकेजीमधील एका चिमुकल्या विद्यार्थ्यासोबत घडलेली धक्कादायक घटना समोर आली असून यामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रोजप्रमाणेच त्या दिवशीही लहान मुलगा शाळेच्या बसमध्ये बसला होता. मात्र त्या दिवशी त्याची मोठी बहीण शाळेत गेली नव्हती. हीच छोटी बाब पुढे गंभीर निष्काळजीपणाच्या घटनेत बदलली.
बसमध्ये बसल्यानंतर मुलगा झोपून गेला. दरम्यान, बसमध्ये बिघाड झाल्याने इतर विद्यार्थ्यांना दुसऱ्या बसमध्ये हलवण्यात आले, मात्र झोपलेल्या मुलाकडे कुणाचाही लक्ष गेले नाही. शाळेत पोहोचल्यानंतर इतर सर्व विद्यार्थ्यांना उतरवण्यात आले, पण हा मुलगा बसमध्येच राहिला. त्यानंतर बस सेक्टर-81 येथील मोठ्या पार्किंग यार्डमध्ये उभी करण्यात आली, जिथे शेकडो ट्रक आणि बस उभ्या होत्या.
काही वेळाने मुलाची झोप उघडली तेव्हा तो पूर्णपणे एकटाच बंद एसी बसमध्ये अडकलेला होता. आजूबाजूला कोणीही नसल्याने तो घाबरून रडू लागला, मदतीसाठी ओरडू लागला आणि दरवाजा ठोठावू लागला. मात्र बसचे दरवाजे लॉक असल्याने त्याचा आवाज बाहेर पोहोचू शकला नाही. दरम्यान, शाळा सुटल्यानंतरही मुलगा घरी न पोहोचल्याने पालकांची चिंता वाढली. शाळेशी संपर्क साधल्यानंतरही सीसीटीव्ही तपास आणि बस लोकेशनमधील निष्काळजीपणामुळे जवळपास दोन ते अडीच तास शोधमोहीम सुरूच राहिली.
हेही वाचा: IND vs WI: वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यापूर्वी टीम इंडियाला इशारा; 'ही' एक चूक केल्यास सेमीफायनलचे स्वप्न भंगणार?
अखेर मुलाचे वडील स्वतः सेक्टर-81 येथील यार्डमध्ये पोहोचले. तेथे सुमारे 600 ट्रक आणि 400 बस उभ्या होत्या. लॉक असलेली बस उघडल्यावर आत त्यांचा मुलगा घाबरलेल्या अवस्थेत बसलेला आढळला. सतत रडल्यामुळे त्याला श्वास घेण्यास त्रास होत होता. जवळपास सहा ते सात तास तो बंद बसमध्ये अडकून होता. हा क्षण कोणत्याही पालकासाठी अत्यंत असह्य ठरणारा होता.
या प्रकरणात अनेक स्तरांवर निष्काळजीपणा उघड झाला. बसमधील विद्यार्थ्यांची अंतिम तपासणी करण्यात आली नव्हती, उपस्थिती नोंदींची पडताळणी झाली नाही, सीसीटीव्ही निरीक्षणात दिरंगाई झाली आणि बस स्टाफने वाहन पूर्णपणे रिकामे असल्याची खात्री केली नाही. इतका वेळ मुलगा बसमध्ये अडकून राहूनही कुणालाही याची माहिती मिळाली नाही.
घटनेनंतर शाळा प्रशासनाने संबंधित ट्रान्सपोर्टरची सेवा बंद करत बस कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. शाळेचे वरिष्ठ अधिकारी आणि मुख्याध्यापकांनी पालकांची भेट घेऊन माफी मागितली असून सुरक्षा व्यवस्थेत सुधारणा करण्याचे आश्वासन दिले आहे. शिक्षण विभागाकडूनही शाळेची तपासणी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
हेही वाचा: Career After 12th Commerce: बारावी झालीय? डिजिटल मार्केटिंग ते ग्राफिक डिझाइन; पाहा कोणत्या डिप्लोमा कोर्सेसना आहे सध्या सर्वाधिक मागणी