Thursday, November 13, 2025 02:55:14 PM

New Financial Rules : आजपासून बदलले नियम; एलपीजी, बँक, जीएसटी आणि पेन्शनर्सवर थेट परिणाम

नोव्हेंबरपासून देशात अनेक आर्थिक नियम बदलले आहेत. एलपीजी दर कपात, नवे बँकिंग नियम, जीएसटी सुधारणा आणि आधार अपडेट शुल्कात बदल लागू झाले आहेत.

new financial rules  आजपासून बदलले नियम एलपीजी बँक जीएसटी आणि पेन्शनर्सवर थेट परिणाम

नवी दिल्ली : नोव्हेंबर महिन्यापासून अनेक महत्त्वाचे आर्थिक बदल लागू झाले आहेत, ज्यांचा थेट परिणाम तुमच्या दैनंदिन खर्चावर होणार आहे. एलपीजीच्या किंमतींपासून आधार अपडेट शुल्क, बँक नियम आणि जीएसटी दरांपर्यंत अनेक बदल लागू झाले आहेत. चला पाहूया, 1 नोव्हेंबरपासून कोणते नवे नियम लागू झाले आणि त्यांचा तुमच्या दैनंदिन जिवनावर कसा परिणाम होणार आहे.

एलपीजी सिलेंडर झाला स्वस्त

IOCL च्या वेबसाईटनुसार, 19 किलोच्या कमर्शियल एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत 5 रुपयांची कपात करण्यात आली आहे. दिल्लीमध्ये या सिलेंडरची किंमत आता 1590.50 रुपये झाली आहे. तथापि, घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. शेवटचा दरबदल एप्रिल महिन्यात झाला होता. त्यामुळे दिवाळीनंतर हॉटेल, रेस्टॉरंट आणि व्यावसायिक वापरकर्त्यांना थोडासा दिलासा मिळणार आहे.

आधार अपडेट शुल्कात बदल

भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) ने मोठा निर्णय घेत 12 वर्षांखालील मुलांच्या आधार कार्डसाठी बायोमेट्रिक अपडेट शुल्क (125 रुपये) एक वर्षासाठी माफ केलं आहे. प्रौढांसाठी नाव, पत्ता, जन्मतारीख किंवा मोबाइल क्रमांक अपडेट करण्यासाठी 75 रुपये आकारले जातील, तर फिंगरप्रिंट किंवा आयरिस स्कॅनसाठी 125 रुपये भरावे लागतील. तसेच, आता सहायक दस्तऐवजांशिवायही ऑनलाइन नाव, पत्ता किंवा जन्मतारीख अपडेट करण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे.

हेही वाचा: 10th, 12th Board Exam Time Table: दहावी-बारावीच्या परीक्षा कधी होणार?, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर

बँक नॉमिनेशनसाठी नवा नियम

1 नोव्हेंबरपासून बँक खाते, लॉकर किंवा सुरक्षित ठेव यासाठी ग्राहकांना जास्तीत जास्त 4 नॉमिनी नियुक्त करण्याची परवानगी मिळाली आहे. या नव्या नियमानुसार, मृत्यू किंवा आपत्कालीन परिस्थितीत कुटुंबीयांना निधीपर्यंत सहज प्रवेश मिळू शकेल आणि मालकीसंबंधी वाद टाळले जातील. नॉमिनी जोडण्याची किंवा बदलण्याची प्रक्रिया देखील सुलभ करण्यात आली आहे.

नवे जीएसटी स्लॅब लागू

सरकारने 1 नोव्हेंबरपासून नवा दोन-स्लॅब जीएसटी सिस्टम लागू केला आहे. याआधी जीएसटी दर 5%, 12%, 18% आणि 28% असे चार स्लॅब होते, परंतु आता 12% आणि 28% चे स्लॅब रद्द करण्यात आले आहेत. लक्झरी आणि हानिकारक वस्तूंवर 40% जीएसटी दर लागू करण्यात आला आहे. या निर्णयामुळे करप्रणाली अधिक सुलभ आणि पारदर्शक होण्याची अपेक्षा आहे.

NPS ते UPS रूपांतरासाठी मुदतवाढ

केंद्रीय कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय पेन्शन प्रणाली (NPS) मधून युनिफाइड पेन्शन योजना (UPS) मध्ये जाण्यासाठी 30 नोव्हेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना निर्णय घेण्यासाठी आणि आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अधिक वेळ मिळाला आहे.

पेंशनर्ससाठी लाइफ सर्टिफिकेटची अंतिम तारीख

केंद्र आणि राज्य सरकारच्या सर्व निवृत्त कर्मचाऱ्यांना नोव्हेंबर अखेरपर्यंत वार्षिक जीवन प्रमाणपत्र (Life Certificate) सादर करावं लागेल. हे प्रमाणपत्र बँक शाखेत किंवा ‘जीवन प्रमाण’ पोर्टलवर ऑनलाइन देता येईल. अंतिम तारीख चुकल्यास पेन्शन मिळण्यास विलंब होऊ शकतो.

SBI कार्डधारकांसाठी नवे शुल्क

1 नोव्हेंबरपासून SBI कार्ड यूजर्सना मोबिक्विक आणि क्रेडसारख्या थर्ड पार्टी अॅपद्वारे शिक्षणाशी संबंधित पेमेंटवर 1% शुल्क आकारले जाणार आहे. तसेच, SBI कार्डद्वारे 1000 रुपयांपेक्षा जास्त रक्कम डिजिटल वॉलेटमध्ये ट्रान्सफर केल्यास 10% शुल्क लागू होईल.

नोव्हेंबरपासून लागू झालेले हे सर्व बदल जनतेच्या दैनंदिन व्यवहारांवर थेट परिणाम करणारे आहेत. त्यामुळे ग्राहकांनी हे नियम लक्षात घेऊन आपल्या आर्थिक नियोजनात बदल करणं आवश्यक आहे.

हेही वाचा: Ajit Doval: डोवाल यांचे वक्तव्य; "जम्मू-काश्मीर वगळता देशभरात 2013 नंतर दहशतवादी हल्ला नाही."


सम्बन्धित सामग्री