Stray Dogs : भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि सार्वजनिक सुरक्षिततेसाठी दिल्ली सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. आता राजधानीतील भटक्या कुत्र्यांच्या शरीरात 'मायक्रोचिप' बसवण्यात येणार असून, त्यांच्या लसीकरणावर अंदाजे 35 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. दिल्ली महानगरपालिका (MCD) आगामी अर्थसंकल्पात या कामासाठी विशेष तरतूद करणार आहे.
नेमकी योजना काय आहे?
दिल्ली महानगरपालिका आपल्या वाट्यातील 20 कोटी रुपये या कामासाठी खर्च करणार आहे, तर उर्वरित 15 कोटी रुपये प्राणी कल्याण क्षेत्रात कार्यरत असलेल्या स्वयंसेवी संस्थांच्या (NGO) माध्यमातून उभे केले जातील. पुढील 2 ते 3 महिन्यांत किमान 25 हजार कुत्र्यांना मायक्रोचिप बसवून त्यांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट महापालिकेने ठेवले आहे. या एका मायक्रोचिपची किंमत सुमारे 300 रुपये इतकी असेल.
हेही वाचा - Stray Cattle : भटक्या प्राण्यांना सांभाळा अन् दरमहा कमवा 12 हजार रुपये... काय आहे सरकारची भन्नाट योजना
मायक्रोचिप कशी काम करणार?
या प्रक्रियेत कुत्र्याच्या कातडीखाली एक छोटी एकात्मिक चिप बसवली जाईल. या चिपमध्ये खालील महत्त्वाची माहिती नोंदवली जाणार आहे:
कुत्र्याची ओळख आणि त्याचे नेमके स्थान.
लसीकरणाचा संपूर्ण इतिहास.
आरोग्याशी संबंधित इतर महत्त्वाची माहिती.
हेही वाचा - Success Story: गरीबीतून प्रेरणा, मेहनतीतून यश! सिंधुदुर्गच्या गोपाळ सावंतची CRPFमध्ये निवड; आईसमोर नतमस्तक होतानाचा व्हिडिओ तुफान व्हायरल
सरकार कोट्यवधी रुपये का खर्च करत आहे?
भटक्या कुत्र्यांच्या लोकसंख्येचे योग्य व्यवस्थापन करणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. शहरात कुत्रा चावण्याच्या घटना किंवा संसर्गजन्य रोगांचा प्रादुर्भाव झाल्यास, चिपमधील माहितीच्या आधारे प्रशासनाला तातडीने कारवाई करणे सोपे जाईल. सार्वजनिक सुरक्षितता आणि प्राण्यांचे आरोग्य या दोन्ही दृष्टीकोनातून हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. महापालिका अधिकाऱ्यांच्या मते, स्वयंसेवी संस्थांच्या भागीदारीमुळे लसीकरण आणि देखरेखीच्या कामाला अधिक गती मिळेल, ज्यामुळे दिल्लीतील भटक्या कुत्र्यांचा प्रश्न मार्गी लावण्यास मदत होईल.