नवी दिल्ली : पाकिस्तानने शनिवारी उत्तरेकडील अरब सागरात 2 ते 5 नोव्हेंबरदरम्यान फायरिंग सराव करण्याची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे, हा सराव भारताच्या चालू असलेल्या त्रिसेना (Tri-Services) लष्करी सराव 'ऑपरेशन त्रिशूल' च्या क्षेत्राशी काही प्रमाणात ओव्हरलॅप होत आहे. दोन्ही देशांच्या समुद्री सीमांचा परिसर लागून असल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे, मात्र लष्करी तज्ज्ञांच्या मते दोन्ही बाजूंतील समन्वयामुळे कोणताही संघर्षजन्य प्रसंग निर्माण होणार नाही.
पाकिस्तानच्या हायड्रोग्राफर विभागाने NAVAREA IX 514/25 ही अधिकृत नोटिस जारी केली असून, सुमारे 6,000 चौ.कि.मी. क्षेत्रात नौदल सराव होणार आहे. या सरावादरम्यान वॉरशिप्स आणि सबमरीनद्वारे थेट फायरिंग आणि सब-सर्फेस ऑपरेशन्स केले जाणार आहेत. पाकिस्तानने व्यापारी जहाजांना "सराव क्षेत्रापासून दूर राहण्याचा" इशारा दिला आहे.
दुसरीकडे, भारताने 31 ऑक्टोबरपासून सुरू केलेल्या 'ऑपरेशन त्रिशूल' या सरावात थलसेना, नौदल आणि वायुदल सहभागी आहेत. राजस्थान, गुजरात आणि अरब सागर या भागांमध्ये हा सराव चालू असून, यात हजारो सैनिक, फायटर जेट्स, युद्धनौका, पाणबुडी, टँक, तोफखाना आणि आधुनिक प्रणालींचा समावेश आहे. हे मे महिन्यात झालेल्या 'ऑपरेशन सिंदूर' नंतरचे सर्वात मोठा सैन्य सराव मानला जात आहे.
हेही वाचा: PM Narendra Modi: बिहारमध्ये मोदींचा प्रचार दौरा; आरा, नवादा आणि पटना येथे भव्य सभा व रोड शो
जिओ-इंटेलिजन्स संशोधक डॅमियन सायमॉन यांनी X वर पोस्ट करत म्हटले की, “पाकिस्तानने ज्या क्षेत्रात फायरिंग सराव घोषित केला आहे, तेच क्षेत्र भारताच्या हवाई सरावासाठी राखीव आहे. मात्र दोन्ही देशांच्या सैन्यांमधील समन्वयामुळे कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही.” भारतीय नौदलाचे व्हाइस अॅडमिरल ए.एन. प्रमोद यांनी सांगितले की, “त्रिसेना सरावाचा उद्देश तिन्ही दलांमध्ये परस्पर सहकार्य आणि समन्वय वाढवणे हा आहे. या सरावात 20-25 युद्धनौका आणि 40 विमानं सहभागी आहेत. तसेच INS जलश्वा आणि इतर प्लॅटफॉर्मद्वारे अँफिबियस ऑपरेशन्स आयोजित करण्यात येतील.”
हा सराव गुजरात आणि पाकिस्तानच्या सिंध प्रांतामधील विवादित सिर क्रीक क्षेत्रालाही व्यापतो. हा 96 कि.मी. लांबीचा सागरी पट्टा दोन्ही देशांमधील वादाचा मुद्दा राहिला आहे. दोन्ही देशांमध्ये यावर शेवटची चर्चा सुमारे 13 वर्षांपूर्वी झाली होती. दरम्यान, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काही दिवसांपूर्वीच इशारा दिला होता की, पाकिस्तानने सिर क्रीक भागात कोणताही गैरप्रकार केल्यास भारताचा प्रतिसाद “इतिहास आणि भूगोल बदलणारा” असेल. त्यांनी असेही म्हटले की, “पाकिस्तान अजूनही भारताने मे महिन्यात दिलेल्या धक्क्यातून सावरत आहे.” दोन्ही देशांच्या सरावामुळे सध्या अरब सागराचा परिसर रणनीतिकदृष्ट्या अधिक संवेदनशील बनला आहे. मात्र संरक्षण विश्लेषकांच्या मते, ही दोन्ही सराव मोहिमा आपापल्या मर्यादेत राहून पार पडतील आणि समुद्री सुरक्षेच्या व्यावसायिकतेचा आदर्श निर्माण करतील.
हेही वाचा: Local Body Election: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत मोठी माहिती समोर, 'या' तारखेला होणार निवडणुका