India-Pakistan Border Arms Recovery : पंजाबमधील पठाणकोट जिल्ह्यात भारत-पाकिस्तान सीमेजवळ पंजाब पोलिसांनी केंद्रीय तपास यंत्रणांच्या मदतीने मोठी कारवाई केली आहे. नरोट जैमल सिंह या सीमावर्ती भागात केलेल्या शोध मोहीमेत जहाल शस्त्रास्त्रांचा साठा सापडला असून, यामुळे राज्याला हादरवून सोडणारा मोठा दहशतवादी हल्ला टळला आहे. हा शस्त्रसाठा पाकिस्तानमधून तस्करी करून भारतात आणण्यात आला होता आणि तो राज्याची शांतता व सुव्यवस्था बिघडवण्यासाठी वापरला जाणार होता, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
चिनी आणि तुर्की बनावटीची शस्त्रे जप्त
पठाणकोट पोलिसांनी नरोट जैमल सिंह येथील शेतातून अत्याधुनिक शस्त्रास्त्रे हस्तगत केली आहेत. यात 3 घातक AK-47 रायफल्स, 5 मॅगझिन, तुर्की आणि चीनमध्ये तयार केलेली प्रत्येकी एक अशी 2 पिस्तुलं, 2 अतिरिक्त मॅगझिन आणि तब्बल 98 जिवंत काडतुसांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, यातील विदेशी बनावटीची शस्त्रे पाहून सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. या शस्त्रांच्या माध्यमातून एखादी खळबळजनक घटना घडवण्याचा दहशतवाद्यांचा मनसुबा होता, जो पोलिसांनी वेळेत उधळून लावला.
पाकिस्तानस्थित हरविंदर सिंह रिंदाचे कनेक्शन
या प्रकरणात डीआयजी बॉर्डर रेंज संदीप गोयल यांनी अत्यंत महत्त्वाची माहिती दिली आहे. या शस्त्र तस्करीमागे 'ISI' समर्थित दहशतवादी हरविंदर सिंह रिंदा याचे नाव समोर आले आहे. रिंदा हा मूळचा गुन्हेगार असून आता तो पाकिस्तानातून दहशतवादी कारवाया चालवत आहे. त्याने आपल्या 'स्लीपर सेल'च्या माध्यमातून हा साठा पठाणकोटच्या बॉर्डर भागात लपवून ठेवला होता. रिंदा हा महाराष्ट्रातील नांदेडचा रहिवासी असून सध्या तो पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा आयएसआयच्या तालावर नाचत असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
हेही वाचा - Hindu-Muslim Property Act: मोठी बातमी! मुस्लिम आता हिंदूंची जमीन खरेदी करू शकणार नाहीत? लवकरच देशभर लागू होणार कायदा?
दहशतवादी नेटवर्क विरोधात मोठी शोधमोहीम
शस्त्रसाठा जप्त केल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणातील धागेदोरे शोधण्यासाठी संपूर्ण परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. नरोट जैमल सिंह परिसरात मोठे 'सर्च ऑपरेशन' सुरू असून, संशयित ठिकाणांवर छापे टाकले जात आहेत. ही शस्त्रास्त्रे कोणाला पोहोचवली जाणार होती आणि या नेटवर्कमध्ये स्थानिक लोकांचा सहभाग आहे का, याचा कसून तपास पोलीस करत आहेत. सुरक्षा यंत्रणांनी सीमेवरील हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे.
सुरक्षा यंत्रणांचा 'अलर्ट' आणि पुढील कारवाई
पंजाब पोलीस आणि केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनी समन्वयाने ही कारवाई केली असली, तरी भविष्यातील धोके पाहता राज्याला हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे. हरविंदर सिंह रिंदा विरोधात नरोट जैमल सिंह पोलीस ठाण्यात विस्फोटक कायदा, शस्त्र कायदा आणि भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीमेपलीकडून होणारी ड्रोन्सची हालचाल आणि शस्त्रांची तस्करी रोखण्यासाठी सीमा सुरक्षा दल (BSF) देखील अधिक आक्रमकपणे गस्त घालत आहे.
हेही वाचा - Mohan Bhagwat : 'दहा-बारा वर्षांत जातिभेद संपुष्टात येईल', सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचा मोठा दावा