मुंबई: 1 मे 2025 पासून ते 4 मे 2025 पर्यंत बीकेसी येथील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेन्मेंट समिट 2025 (waves 2025) या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, 1 मे 2025 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या भव्य कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे. सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत उद्योग मंत्री उदय सामंत यांनी ही माहिती दिली आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र सरकार करत असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली या कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल. 1 मे 2025 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान मोदी यांच्यासोबत परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे देखील सहभागी होणार आहेत.
उद्योग मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत म्हणाले की, 'मुंबई हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर आहे. खासकरून मुंबईला हिंदी चित्रपटसृष्टीचे माहेरघर म्हटले जाते. भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक म्हणून ओळखले जाणारे दादासाहेब फाळके यांनी याच महाराष्ट्रामध्ये मराठी चित्रपट सुरू केले होते. त्यामुळे, मनोरंजनाच्या क्षेत्रात मुंबई हे देशातील महत्वाचे शहर आहे. गेल्या तीन वर्षांत महाराष्ट्रातील परदेशी गुंतवणूक ही पहिल्या क्रमांकावर आहे. पर्यटनाच्या बाबतीतही महाराष्ट्र देशाच्या पातळीवर इतर देशांसोबतही स्पर्धा करत आहे. त्यामुळे सर्व पर्यटनस्थळे जागतिक पातळीवर गेली पाहिजेत, हाच या जागतिक ऑडिओ व्हिज्युअल मनोरंजन परिषदेचा मुख्य उद्देश आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, औद्योगिक आणि पर्यटन संस्कृती त्यासोबत महाराष्ट्राच्या ज्या काही परंपरा आहेत, त्या जागतिक पातळीवर जाव्यात यासाठी मुंबई शहराची निवड केंद्र शासनाने केली आहे'.
हेही वाचा: पुणेकरांसाठी खुशखबर; पुणे विमानतळावर दहा रुपयात चहा आणि वीस रुपयात कॉफी
पुढे, उद्योग मंत्री सामंत यांनी सांगितले की, 'या कार्यक्रमामध्ये 33 देशांतील मंत्री, मंत्रीस्तरीय अधिकारी आणि 120 आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे मुख्य कार्यकारी आणि अधिकारी देखील उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात बॉलिवूड, टॉलीवूड, मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकार आणि निर्माते देखील सहभागी होणार आहेत'.
'चार दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात भारत, महाराष्ट्र, तेलंगणा आणि इतर संस्थांचेही पॅव्हेलियन असतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या भव्य कार्यक्रमाचे उद्घाटन होईल. या दरम्यान, विविध क्षेत्रांतील परिसंवाद, राउंड टेबल कॉन्फरन्स, आणि सांस्कृतिक कार्यक्रम यांचा समावेश असेल. कार्यक्रमाच्या तिसऱ्या दिवशी म्हणजेच 3 मे 2025 रोजी नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर ए. आर. रहमान यांच्या सांगितिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, औद्योगिक आणि पर्यटन क्षेत्रांना जागतिक स्तरावर नेण्याची संधी आहे. या भव्य कार्यक्रमासाठी राज्य सरकारला सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा आहे', असे आवाहनही उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केले आहे.