राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी हरियाणातील अंबाला वायुसेना तळावरून राफेल लढाऊ विमानात उड्डाण करून एक महत्त्वपूर्ण क्षण नोंदवला. वायुसेना प्रमुख एअर चीफ मार्शल अमर प्रीत सिंह यांनी स्वतः राफेल विमानाचे पायलटिंग केले. उड्डाणाआधी राष्ट्रपतींना औपचारिकरित्या गार्ड ऑफ ऑनर प्रदान करण्यात आला.
सशस्त्र दलांच्या सर्वोच्च सेनापती म्हणून राष्ट्रपतींचा हा उपक्रम भारतीय वायुसेनेवरील विश्वास आणि बळकट क्षमतांचे द्योतक असल्याचे संरक्षण तज्ज्ञांचे मत आहे. विशेष म्हणजे, अलीकडेच पवईगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत राफेलचा वापर करत अचूक लक्ष्यभेदी कारवाई केली होती.
राष्ट्रपती मुर्मू यांचे लढाऊ विमानातील हे दुसरे उड्डाण आहे. त्यापूर्वी, 8 एप्रिल 2023 रोजी त्यांनी असममधील तेजपूर वायुसेना तळावरून सुखोई-30 एमकेआयमध्ये उड्डाण केले होते. अशा प्रकारे लढाऊ विमानात उड्डाण करणाऱ्या त्या भारताच्या तिसऱ्या राष्ट्रपती ठरल्या आहेत.
हेही वाचा: Metro vs AC Local: मुंबईमध्ये रंगली नवी चर्चा; प्रवासी म्हणतायेत, मेट्रो 3 पेक्षा आपली एसी लोकल बरी! या चर्चेमागे नेमके कारण काय आहे?
फ्रान्सच्या दसो एव्हिएशन कंपनीने विकसित केलेले राफेल विमान सप्टेंबर 2020 मध्ये अंबाला वायुसेना तळावर भारतीय हवाई दलात सामील झाले. पहिला तुकडा ‘17 व्या स्क्वाड्रन गोल्डन एरोज’ मध्ये समाविष्ट करण्यात आला होता. हे फायटर जेट्स 27 जुलै 2020 रोजी फ्रान्सहून भारतात दाखल झाले.
राफेलची गती, अचूकता आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे भारतीय वायुसेनेची प्रतिकारशक्ती अधिक मजबूत झाली आहे. नियंत्रण रेषेपलीकडील दहशतवादी तळांवर केलेल्या कारवायांमध्ये या विमानांनी प्रभावी भूमिका बजावली असून, सुरक्षा व सामरिक दबाव वाढवण्यात त्यांचे योगदान महत्त्वाचे समजले जाते.
राष्ट्रपती मुर्मू यांच्या या उड्डाणामुळे भारतीय जवानांना मिळालेलं प्रोत्साहन आणि सशस्त्र दलांवरील तेवढाच जनविश्वास अधोरेखित झाल्याची भावना सैन्य व संरक्षण क्षेत्रात व्यक्त होत आहे.
हेही वाचा: Lawrence Bishnoi Gang: कॅनडामध्ये लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून व्यावसायिकाचा खून तर एका पंजाबी गायकाच्या घरीही गोळीबार