मुंबई मेट्रो लाइन-3 (एक्वा लाइन) च्या अंतिम टप्प्याची सुरुवात झाल्यानंतर उत्तर आणि दक्षिण मुंबईदरम्यानचा प्रवास अधिक वेगवान आणि आरामदायी झाला आहे. आधुनिक सुविधा, जलद सेवा आणि भुयारी मार्गामुळे प्रवाशांचा वेळ मोठ्या प्रमाणात वाचू लागला आहे. मात्र या सोयीसोबतच आता मेट्रो आणि एसी लोकल ट्रेनच्या भाड्यातील फरकावर प्रवासी मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.
अंधेरी ते चर्चगेट दरम्यान रोज प्रवास करणाऱ्या एका प्रवाश्याने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर आपले प्रवास खर्चाची तुलना मांडली. त्यांच्या म्हणण्यानुसार, एसी लोकलचा 25 दिवसांसाठी एकूण खर्च सुमारे 1,335 रुपयेच्या आसपास येतो, तर मेट्रो लाइन-3 वापरल्यास तेच अंतर पार करण्यासाठी महिन्याला जवळपास 3,500 रुपये खर्च येतो. म्हणजेच जवळपास दुपटीहून अधिक रक्कम मेट्रोसाठी मोजावी लागत आहे.
या पोस्टनंतर नेटिझन्समध्ये चर्चा रंगली. “एसी लोकलच्या फेऱ्या मर्यादित आहेत, तर मेट्रो सतत धावत असते. त्यामुळे स्वाभाविकच लोक मेट्रोकडे वळतील,” असे एका यूजरने सांगितले. काहींनी गर्दी हे मोठे कारण असल्याचे सांगत, “एसी लोकलमध्ये अजूनही मोठी गर्दी असते; शांत प्रवासासाठी मेट्रोची प्रीमियम किंमतही अनेक जण देण्यास तयार आहेत,” असे मत व्यक्त केले.
हेही वाचा: Maharashtra Local Body Election: नगरपालिका, नगर पंचायतीच्या निवडणुका लवकरच होणार, कधीपासून आचारसंहिता लागणार
मेट्रोद्वारे उपलब्ध होणाऱ्या पायाभूत सुविधा, सुरक्षितता, स्वच्छता आणि प्रवासाच्या वेळेत होणारी बचत पाहता भाडे न्याय्य असल्याचे अनेकांचे मत आहे. “एसी लोकल 1 रुपया प्रति किलोमीटर आणि मेट्रो 2 रुपया प्रति किलोमीटर आकारते. ही किंमत देखील मेट्रोच्या सुविधांनुसार कमीच आहे,” असे एका प्रवाशाने म्हटले. तसेच, स्टेशनपासून कार्यालयापर्यंत चालावे कमी लागते ही व्यथा ही काहींनी मांडली.
ट्रॅफिक आणि पर्यावरणाच्या दृष्टीनेही मेट्रो महत्त्वाची ठरत असल्याचे काही यूजर्सने सांगितले. “लोकांना ओला-उबरमधून बाहेर काढणे हा मेट्रोचा उद्देश आहे. वाहतुकीत सुधारणा झाल्यास बससुद्धा वेगाने धावतील,” अशी प्रतिक्रिया एका नागरिकाने दिली. मात्र, सर्वांसाठी हा पर्याय आर्थिकदृष्ट्या परवडणारा नाही, असेही काहींनी नमूद केले.
एकंदरीत पाहता, मुंबईकरांच्या दैनंदिन जीवनात मेट्रो लाइन-3 ने नवी सुविधा आणली असली, तरी प्रवाशांच्या खिशाला न परवडणारा वाढीव खर्च हा मोठ्या चर्चेचा विषय बनला आहे. वेळेची बचत आणि अधिक आराम हवे असणाऱ्यांसाठी मेट्रो हा उत्तम पर्याय ठरत आहे. परंतु, सर्वसामान्य प्रवाशांसाठी एसी लोकल हा अजूनही अधिक किफायतशीर आणि उपलब्ध पर्याय असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे.
हेही वाचा: US Operations In Pacific: ड्रग तस्करी रोखण्यासाठी अमेरिकेचा पॅसेफीक समुद्रात हल्ला; कारवाईत 14 ठार, 4 नौका नष्ट