Thursday, November 13, 2025 01:56:05 PM

Priyanka Gandhi: प्रियांका गांधींचा संताप , म्हणाल्या “दरवर्षी दिल्लीकरांना विषारी हवेत जगावं लागतं”

प्रियांका गांधी यांनी दिल्लीतील वाढत्या प्रदूषणाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांना तातडीने पावलं उचलण्याचं आवाहन केलं.

priyanka gandhi प्रियांका गांधींचा संताप  म्हणाल्या  “दरवर्षी दिल्लीकरांना विषारी हवेत जगावं लागतं”

नवी दिल्ली: काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी रविवारी दिल्लीतील वाढत्या प्रदूषणाबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांना तात्काळ उपाययोजना करण्याचं आवाहन केलं. प्रियांका गांधी यांनी सामाजिक माध्यम X वर लिहिलं, “वायनाड आणि बिहारमधील बछवारा येथून परत आल्यानंतर दिल्लीतील हवेतला फरक पाहून धक्का बसला. राजधानीच्या आकाशावर प्रदूषणाचा राखाडी पडदा पसरला आहे.” त्यांनी पुढे सांगितलं, “राजकीय मतभेद बाजूला ठेवून सर्व नेत्यांनी एकत्र येऊन या परिस्थितीवर काहीतरी ठोस करायला हवं. केंद्र आणि राज्य सरकारांनी तात्काळ पावलं उचलायला हवीत. आम्ही त्यांच्या प्रत्येक प्रयत्नात सहकार्य करू.”

“दरवर्षी दिल्लीकरांना विषारी हवेत जगावं लागतं” प्रियांका गांधी प्रियांका गांधी यांनी म्हटलं की, श्वसनाच्या समस्या असलेले रुग्ण, शाळेत जाणारी लहान मुलं आणि वयोवृद्ध नागरिक हे या प्रदूषणामुळे सर्वाधिक त्रस्त आहेत. “दरवर्षी दिल्लीतील नागरिकांना या विषारी वातावरणात राहावं लागतं, पण त्यावर कुठलाही कायमस्वरूपी उपाय होत नाही. हे आता थांबवायला हवं,” असं त्या म्हणाल्या.

हवेच्या गुणवत्तेत बिघाड; वायनाडच्या तुलनेत दिल्ली ‘धुरकट’

प्रियांकांनी सांगितलं की, वायनाडमध्ये स्वच्छ आणि शुद्ध हवा अनुभवली, पण दिल्लीमध्ये परतल्यावर जणू शहरावर राखेचं जाळं पसरल्यासारखं वाटलं. दिल्लीतील AQI (Air Quality Index) गेल्या काही दिवसांत 400 च्या वर पोहोचला असून शहरातील अनेक भागात धुकं आणि धूर यांचा घनदाट थर कायम आहे.

काँग्रेस नेते जयराम रमेश यांचाही सरकारवर निशाणा

दरम्यान, काँग्रेसचे वरिष्ठ नेते जयराम रमेश यांनी दिल्लीतील ‘क्लाऊड सीडिंग’ प्रयोगावर टीका करत तो “क्रूर विनोद” असल्याचं म्हटलं. रमेश यांनी सांगितलं की, “दिल्ली सरकारने हवामान सुधारण्यासाठी क्लाऊड सीडिंग प्रयोगावर 34 कोटी रुपये खर्च केले, परंतु तीन तज्ज्ञ संस्थांनी या हिवाळ्यात असा प्रयोग करू नये, असा सल्ला दिला होता.” या संस्थांमध्ये कमिशन फॉर एअर क्वालिटी मॅनेजमेंट, सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड आणि भारतीय हवामान विभाग यांचा समावेश आहे. रमेश यांच्या म्हणण्यानुसार, केंद्र सरकारकडूनच या संस्थांनी 2024 मध्ये राज्यसभेत अशी भूमिका मांडली होती.

प्रदूषण नियंत्रणासाठी सर्वसमावेशक धोरणाची मागणी

काँग्रेस नेत्यांच्या या विधानांनंतर पुन्हा एकदा दिल्लीतील प्रदूषणावर राजकीय वाद पेटण्याची शक्यता आहे. प्रियांका गांधी यांनी केंद्र आणि राज्य सरकार दोघांनाही लोकांच्या आरोग्याशी खेळू नये, असं बजावत सर्व पक्षांनी एकत्र येऊन “शुद्ध हवा हा नागरिकांचा मूलभूत हक्क आहे” हे लक्षात ठेवण्याचं आवाहन केलं.

हेही वाचा: Stenographer Recruitment: मुंबई उच्च न्यायालयात स्टेनोग्राफर भरती; 1.77 लाखांपर्यंत मिळणार पगार


सम्बन्धित सामग्री