SC On Frivolous Petition: देशातील सर्वोच्च न्यायालयात दररोज हजारो याचिका दाखल होतात, परंतु काही याचिका न्यायालयाचा अमूल्य वेळ वाया घालवणाऱ्या असतात. अशाच एका 'निरर्थक' याचिकेवर सुनावणी करताना सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी याचिकाकर्त्याला चांगलेच धारेवर धरले. याचिकेतील भाषेवरून संशय व्यक्त करत सरन्यायाधीशांनी याचिकाकर्त्याला न्यायालयातच इंग्रजीची परीक्षा घेण्याचे आव्हान दिले, ज्यामुळे न्यायालयाच्या आवारात काही काळ शांतता पसरली.
बारावी पास याचिकाकर्ता आणि क्लिष्ट इंग्रजी मसुदा
सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी याचिकाकर्त्याला त्याच्या पार्श्वभूमीबद्दल विचारले. त्याने आपण लुधियानातील एका शाळेतून केवळ 12 वी पास असल्याचे सांगितले. मात्र, याचिकेत वापरलेली संवैधानिक शब्दरचना आणि इंग्रजी भाषेचा स्तर पाहून सरन्यायाधीशांना शंका आली. "ही याचिका तुम्हीच तयार केली आहे का?" असा प्रश्न विचारल्यावर याचिकाकर्त्याने होकार दिला. त्यावर संतापून सरन्यायाधीश म्हणाले, "मी इथेच तुमची इंग्रजीची परीक्षा घेईन, जर तुम्हाला 100 पैकी 30 गुण मिळाले, तरच मी या विषयाच्या चौकशीचे आदेश देईन."
एआय टूल (AI Tool) आणि टायपिस्टचा समावेश
याचिकेचा मसुदा कोणी तयार केला, यावरून न्यायालयात उलटतपासणी सुरू झाली. संबंधित वकिलाने अखेर कबुली दिली की, यासाठी 'एआय टूल्स'ची मदत घेण्यात आली होती. इतकेच नाही तर एका टायपिस्टला तासाला 1000 रुपये आणि भेटवस्तू देऊन हा मसुदा टाईप करून घेतल्याचे समोर आले. 'विशाल जोखीम' (Fiduciary Risk) सारख्या क्लिष्ट शब्दांचा अर्थ काय, असे विचारले असता याचिकाकर्ता निरुत्तर झाला. यावरून ही याचिका स्वतः याचिकाकर्त्याने तयार केलेली नसून ती कोणाकडून तरी लिहून घेतल्याचे स्पष्ट झाले.
"स्वेटर बनवा आणि विका, पण फालतू याचिका करू नका"
सुनावणीच्या शेवटी सरन्यायाधीशांनी याचिकाकर्त्याला कडक इशारा दिला. "अशा अस्पष्ट आणि निरर्थक याचिकांमार्फत न्यायालयाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करू नका. अशा याचिकांमुळे व्यवस्थेवर ताण येतो," असे त्यांनी बजावले. याचिकाकर्त्याच्या व्यवसायाचा संदर्भ देत सरन्यायाधीश उपरोधिकपणे म्हणाले, "जा आणि काही स्वेटर बनवून ते विका, पण भविष्यात अशा जनहित याचिका दाखल केल्या तर तुम्हाला मोठा दंड भरावा लागेल." न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावत भविष्यात अशा प्रकारच्या कृतींविरुद्ध कडक इशारा दिला आहे.