दुबई: पश्चिम आशियातील वाढत्या युद्धजन्य परिस्थितीचा फटका भारतीय बॅडमिंटनपटू आणि दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेती पी. व्ही. सिंधू हिलाही बसला आहे. दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ झालेल्या स्फोटानंतर ती सध्या दुबईमध्ये अडकून पडली असून परिस्थिती अत्यंत भीतीदायक असल्याचे तिने सांगितले आहे. इराण आणि इस्त्रायल यांच्यात वाढत चाललेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर सिंधूने सोशल मीडियाद्वारे तिचा अनुभव शेअर केला.
पी. व्ही. सिंधूने सांगितले की, विमानतळ परिसरात थांबले असताना काही तासांपूर्वी त्यांच्या जवळच मोठा स्फोट झाला. स्फोटानंतर धूर आणि अवशेष पसरल्याने तिच्या प्रशिक्षकाला तातडीने सुरक्षित ठिकाणी धाव घ्यावी लागली. हा क्षण अत्यंत तणावपूर्ण आणि भयावह होता, असे तिने नमूद केले. परिस्थिती प्रत्येक तासागणिक अधिक गंभीर होत असल्याचेही सिंधूने पोस्टमध्ये म्हटले आहे.
दुबई विमानतळ प्रशासन, स्थानिक प्राधिकरणे आणि दुबईतील भारतीय उच्चायुक्तालयाच्या (Indian High Commission) मदतीमुळे सर्व खेळाडूंना सुरक्षित स्थळी हलवण्यात आल्याची माहिती सिंधूने दिली. संबंधित अधिकाऱ्यांनी सातत्याने मदत आणि सुरक्षा पुरवल्याबद्दल तिने आभारही व्यक्त केले. सध्या सर्वजण सुरक्षित असून परिस्थिती स्थिर होण्याची प्रतीक्षा करत असल्याचे तिने सांगितले.
हेही वाचा: DGCA Action Plan: क्षितिजावर युद्धाचे ढग; इराण-इस्रायल युद्धाचा जगभरातील हजारो उड्डाणांना फटका, DGCA चा 'रेड अलर्ट'
सिंधू ही बर्मिंगहॅम येथे होणाऱ्या प्रतिष्ठित इंग्लंड ओपन स्पर्धेसाठी प्रवास करत होती. मात्र अमेरिका आणि इस्त्रायलच्या इराणवरील कारवायांनंतर निर्माण झालेल्या तणावामुळे सर्व उड्डाणे पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात आली. विमानतळावर मोठ्या प्रमाणात प्रवासी अडकले असून अनेक कुटुंबे अनिश्चिततेत प्रतीक्षा करत असल्याचे तिने व्हिडिओद्वारे सांगितले.
“आकाशात सुरू असलेली संरक्षणात्मक कारवाई आणि झपाट्याने बदलणारी परिस्थिती पाहून धक्का बसतो आहे. नेहमी सुरक्षित आणि उत्साही वाटणारे दुबई आज वेगळेच दिसत आहे,” असे सिंधूने भावनिक शब्दांत म्हटले. युद्ध परिस्थितीमुळे तिच्या स्पर्धेच्या वेळापत्रकावरही अनिश्चितता निर्माण झाली असून उड्डाण सेवा कधी सुरू होणार याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही.
दरम्यान, आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्या मृत्यूबाबत दावे समोर आले असून परिस्थिती अत्यंत संवेदनशील बनली आहे. मात्र या संदर्भातील अधिकृत आणि स्वतंत्र पुष्टीची प्रतीक्षा कायम आहे. पश्चिम आशियातील घडामोडींमुळे जागतिक स्तरावर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
हेही वाचा: Delhi Airport Advisory: पश्चिम आशियातील तणावामुळे विमानांचे मार्ग बदलले; दिल्ली विमानतळाकडून प्रवाशांसाठी महत्त्वाची नियमावली जाहीर, सतर्कतेचा इशारा