ATM Cash Crunch: ऑनलाइन व्यवहारांचा वापर वाढला असला तरी, अनेक ऐनवेळच्या प्रसंगी नागरिकांना रोख रकमेसाठी एटीएमवरच अवलंबून राहावे लागते. मात्र, आगामी काळात एटीएममधून पैसे काढताना सर्वसामान्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागण्याची चिन्हे आहेत. देशातील आघाडीच्या रोख व्यवस्थापन (कॅश मॅनेजमेंट) कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांनी वेतनवाढीच्या मागणीसाठी अचानक कामबंद आंदोलन पुकारले आहे. हा संप जर असाच सुरू राहिला, तर बँकांच्या एटीएममधील रोकड संपून नागरिकांची गैरसोय होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
या राज्यांमध्ये संपाची तीव्रता अधिक; बँकिंग क्षेत्राची चिंता वाढली
सध्याच्या घडीला या आंदोलनाचा सर्वाधिक फटका दिल्ली, हरियाण आणि उत्तर प्रदेश या राज्यांना बसत आहे. रोख रक्कम भरण्याचे काम करणाऱ्या 'हिताची पेमेंट सर्व्हिसेस' आणि 'सीएमएस इन्फो सिस्टीम्स' या प्रमुख कंपन्यांचे कर्मचारी या संपात सहभागी झाले आहेत. सध्या ठराविक राज्यांपुरते मर्यादित असलेले हे संकट लवकरच देशाच्या इतर भागांतही पसरण्याची भीती वर्तवली जात आहे. रोख व्यवस्थापन करणाऱ्या खासगी कंपन्यांच्या या भूमिकेमुळे, सर्वात मोठे एटीएम नेटवर्क असलेल्या सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी बँकांसमोर रोकड टंचाईचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.
हेही वाचा – WhatsApp Safety Settings: व्हॉट्सॲपवर स्कॅमर्सचा खेळ खल्लास! सुरक्षित राहण्यासाठी आजच ऑन करा 'या' 5 सेटिंग्स
खर्चामध्ये 20 टक्क्यांनी वाढ; संघर्षाचे मूळ कारण समोर
या वादाच्या पार्श्वभूमीवर, एटीएम उद्योग महासंघाने (CATMi) गेल्या महिन्यातच भारतीय बँक संघटनेला (IBA) पत्र लिहून एटीएम यंत्रणेवर येणाऱ्या अतिरिक्त ताणाची कल्पना दिली होती. महासंघाच्या माहितीनुसार, नवीन वेतन संहिता लागू झाल्यामुळे आणि इंधनाचे दर सातत्याने वाढत असल्यामुळे एटीएमच्या दैनंदिन संचलनाचा खर्च जवळपास 20 टक्क्यांनी वाढला आहे. याच वाढत्या खर्चामुळे कंपन्या आणि कर्मचारी यांच्यात वेतनावरून वाद निर्माण झाला असून, बँकांनी या समस्येवर लवकरात लवकर मध्यस्थी करून तोडगा काढावा, अशी मागणी केली जात आहे.