नवी दिल्ली: आम आदमी पक्षातून बाहेर पडून भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्याचा दावा करणारे राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांनी नुकताच एक व्हिडिओ प्रसिद्ध करत त्यांच्या निर्णयामागील कारणे स्पष्ट केली आहेत. गेल्या काही दिवसांत अनेकांकडून आलेल्या संदेशांना उत्तर देण्यासाठी हा व्हिडिओ तयार केल्याचे त्यांनी सांगितले. काहींनी त्यांच्या निर्णयाचे स्वागत केले, तर काहींनी यामागील कारण जाणून घेण्याची उत्सुकता व्यक्त केली होती.
राघव चड्ढा यांनी स्पष्टपणे म्हटले की, “मी पक्ष सोडण्याचा निर्णय अचानक घेतलेला नाही. गेल्या काही वर्षांपासून मला जाणवत होते की पक्षाची दिशा बदलली आहे.” त्यांनी सांगितले की, त्यांच्या मते आम आदमी पक्ष आता पूर्वीसारखा राहिलेला नाही. त्यांनी पक्षावर टीका करत म्हटले की, येथे आता काम करण्यास अडथळे निर्माण होतात आणि राज्यसभेत बोलण्यालाही मर्यादा घातल्या जातात.
राजकारणात येण्यापूर्वी आपण चार्टर्ड अकाउंटंट होतो आणि उत्तम करिअर सोडून सार्वजनिक जीवनात प्रवेश केला, असे त्यांनी नमूद केले. “मी राजकारणात काही मिळवण्यासाठी नव्हे, तर देशासाठी काही करण्यासाठी आलो होतो,” असे त्यांनी सांगितले. पक्षाचे संस्थापक सदस्य म्हणून 15 वर्षे काम करताना त्यांनी प्रचंड मेहनत घेतल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.
हेही वाचा: Stock Market Today: शेअर बाजारात पुन्हा तेजीची लाट! सेन्सेक्स 500 अंकांनी वधारला, निफ्टीने गाठली 24 हजारांची पातळी
पक्षावर गंभीर आरोप करताना त्यांनी म्हटले की, आता पक्ष काही भ्रष्ट आणि तडजोडी करणाऱ्या व्यक्तींच्या नियंत्रणात गेला आहे. “देशसेवेऐवजी वैयक्तिक स्वार्थ साधण्याकडे झुकलेला पक्ष मला मान्य नव्हता. त्यामुळे मी चुकीच्या ठिकाणी योग्य व्यक्ती असल्याची जाणीव मला होत होती,” असे त्यांनी स्पष्ट केले.
पक्ष सोडल्यानंतर त्यांच्या समोर तीन पर्याय होते राजकारण सोडणे, पक्षात राहून बदल घडवण्याचा प्रयत्न करणे किंवा दुसऱ्या पक्षात जाऊन सकारात्मक राजकारण करणे. अखेरीस त्यांनी तिसरा पर्याय स्वीकारल्याचे सांगितले. त्यांनी पुढे दावा केला की, त्यांच्या सोबत एकूण सात खासदारांनीही हा निर्णय घेतला आहे.
“एक व्यक्ती चुकीची असू शकते, दोनही असू शकतात; पण सात जण चुकीचे असू शकत नाहीत,” असे म्हणत त्यांनी आपल्या निर्णयाचे समर्थन केले. पक्षातील कामकाजाचे वातावरण ‘टॉक्सिक’ झाल्यामुळे अशा परिस्थितीत काम करणे कठीण होते, असेही त्यांनी नमूद केले.
शेवटी त्यांनी जनतेला आश्वासन दिले की, पक्ष बदलला असला तरी त्यांच्या कामाची दिशा बदलणार नाही. “मी आधीसारखाच संसदेत तुमचे प्रश्न मांडत राहीन,” असे सांगत त्यांनी आपल्या पुढील राजकीय प्रवासाबाबत सकारात्मक भूमिका मांडली आहे.
हेही वाचा: Arvind Kejriwal: अरविंद केजरीवाल यांचे न्यायमूर्तींना पत्र; 'न्यायाची आशा संपली, आता..'; न्यायमूर्ती स्वर्ण कांता शर्मा यांच्या कोर्टात बाजू मांडण्यास नकार