Rahul Gandhi: राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आक्षेपार्ह विधान केले होते. या प्रकरणी भाजप कार्यकर्ता महेश श्रीश्रीमल यांनी मानहानीचा खटला दाखल केला होता. हा खटला रद्द करण्याची मागणी करणारी याचिका राहुल गांधींनी केलेली, मात्र ती मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे.
PM मोदींवर कोणती टीका केली होती?
या प्रकरणाची सुरुवात 2018 मध्ये राजस्थानमध्ये झालेल्या एका सभेतील राहुल गांधी यांच्या वक्तव्यावरून झाली. राफेल लढाऊ विमानांच्या व्यवहारावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना राहुल गांधी यांनी ‘कमांडर-इन-थीफ’ तसेच ‘चोरों के सरदार’ अशा शब्दांचा वापर केल्याचा आरोप आहे. या वक्तव्याविरोधात भाजपचे कार्यकर्ते महेश श्रीश्रीमल यांनी गिरगाव महानगर दंडाधिकारी न्यायालयात मानहानीची तक्रार दाखल केली होती.
राहून गांधींच्या याचिकेत काय नमूद केलेले होते?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या मते ही तक्रार सुनावणीयोग्य नसल्याचा तर्क या याचिकेत देण्यात आला होता. भाषणात टिप्पणी करताना कोणाचेही नाव घेतले नव्हते आणि कोणतीही ओळख पटेल किंवा कोणत्याही विशेष वर्गाचं नावही घेण्यात आले नव्हते, असे याचिकेत नमूद करण्यात आले होते.
राहुल यांच्या याचिकेत केलेला हा युक्तिवाद उच्च न्यायालयाने फेटाळला. भाजप राष्ट्रीय स्तरावरचा पक्ष आहे. दरम्यान, राहुल यांनी 2018 च्या एका सभेत पंतप्रधान मोदींवर टीका करताना ही वादग्रस्त टिप्पणी केली होती. यांच्या या वक्तव्यामुळे केवळ पंतप्रधानच नाहीत, तर संपूर्ण भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची प्रतिमा मलिन झाली आहे, असा दावा तक्रारीत करण्यात आला होता. ही तक्रार रद्द करण्यासाठी राहुल यांच्या वतीने दाखल याचिका उच्च न्यायालयाने रद्द केली. त्यामुळे राहुल यांच्याविरोधात कनिष्ठ न्यायालयात मानहानीच्या प्रकरणावरील कार्यवाही सुरूच राहणार आहे.