नवी दिल्ली: इंडिगोसह अनेक विमान कंपन्यांनी अचानक मोठ्या प्रमाणात उड्डाणे रद्द केल्यानंतर देशभरातील लाखो प्रवासी रेल्वेकडे वळले. वाढती गर्दी आणि तिकीटांच्या मोठ्या मागणीचा तातडीने विचार करून भारतीय रेल्वेने तत्काळ पावले उचलली. 6 डिसेंबर 2025 पासून अनेक मार्गांवर अतिरिक्त डबे जोडणे आणि काही गाड्यांचे अतिरिक्त फेऱ्या चालू करण्याचा निर्णय अमलात आणण्यात आला. त्यामुळे प्रवाशांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळू लागला आहे. विमानसेवा ठप्प झाल्याचा सर्वाधिक परिणाम दक्षिण भारतात जाणवला. याची दखल घेत दक्षिण रेल्वेने 18 गाड्यांना अधिक डबे जोडले आहेत. लोकप्रिय मार्गांवर स्लीपर आणि चेयर कारची संख्या वाढवून अतिरिक्त सीट उपलब्ध करून देण्यात आल्या. त्यामुळे बेंगळुरू, चेन्नई, आणि तिरुवनंतपुरम यांसारख्या शहरांच्या प्रवासाची परिस्थिती पुन्हा सुरळीत होत आहे.
दिल्लीकडे जाणाऱ्या आणि तेथून येणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त असल्याने उत्तर रेल्वेने आठ प्रमुख गाड्यांमध्ये अतिरिक्त AC आणि चेयर कार डबे जोडले आहेत. हा बदल तत्काळ लागू करण्यात आला असून पंजाब, हरियाणा, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशातील प्रवाशांना मोठी सोय झाली आहे.
विमानसेवा रद्द झाल्याने दिल्ली-मुंबई प्रवास अत्यंत कठीण झाला होता. यामुळे पश्चिम रेल्वेने चार मुख्य गाड्यांमध्ये 3AC आणि 2AC कोच वाढवले आहेत. 6 डिसेंबरपासून नव्या व्यवस्थेची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर या अतिव्यस्त मार्गावर हजारो प्रवाशांना सुटकेचा श्वास मिळाला आहे.
पूर्व मध्य रेल्वेने पटना-दिल्ली प्रवाशांसाठी विशेष उपाययोजना केली आहे. राजेंद्रनगर-नवी दिल्ली राजधानी एक्सप्रेससाठी 6 ते 10 डिसेंबरदरम्यान पाच अतिरिक्त फेऱ्या चालवल्या जात आहेत. तसेच गाडीत 2AC कोचची संख्या वाढवण्यात आली आहे, ज्यामुळे या रूटवरील ताण कमी झाला आहे. ओडिशाहून दिल्लीला जाणाऱ्या प्रवाशांसाठी ईस्ट कोस्ट रेल्वेने 20817, 20811 आणि 20823 क्रमांकाच्या गाड्यांमध्ये पाच विशिष्ट फेऱ्यांदरम्यान 2AC कोच वाढवले आहेत. पूर्व रेल्वेने 7 आणि 8 डिसेंबरला तीन प्रमुख गाड्यांमध्ये स्लीपर डबे वाढवले. तर ईशान्य फ्रंटियर रेल्वेने 6 ते 13 डिसेंबरदरम्यान आठ अतिरिक्त फेऱ्यांसह 3AC आणि स्लीपर आसनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढवली आहे.
रेल्वेने चार विशेष गाड्याही चालू केल्या
अडचणीत असलेल्या प्रवाशांच्या सोयीसाठी आणि लांब पल्ल्याच्या प्रवासाला गती देण्यासाठी चार विशेष गाड्या चालवण्यात आल्या आहेत. यात गोरखपूर-आनंद विहार स्पेशल, नवी दिल्ली-मुंबई सेंट्रल स्पेशल, नवी दिल्ली-श्रीनगरसाठी वंदे भारत स्पेशल आणि हजरत निजामुद्दीन-तिरुवनंतपुरम स्पेशलचा समावेश आहे. काही गाड्या एकाच दिशेने चालवल्या गेल्या, ज्यांचा उद्देश फक्त प्रवाशांना त्वरित मदत करणे हा होता. उड्डाणे रद्द झाल्यानंतर अचानक वाढलेल्या तिकीट मागणीमुळे दिल्ली, मुंबई, बेंगळुरू, चेन्नई आणि पटना यांसारख्या मोठ्या शहरांतील नागरिकांसमोर मोठी अडचण निर्माण झाली होती. अशा स्थितीत रेल्वेने घेतलेला हा तातडीचा निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरला असून हजारो अतिरिक्त सीट उपलब्ध झाल्याने प्रवाशांना सुरक्षित आणि विश्वासार्ह पर्याय मिळाला आहे.