Friday, March 13, 2026 11:22:54 PM

Indian Restaurant in London: 16 वर्षांपासून भारतीय खाद्यसंस्कृतीची ओळख बनलेले ‘Rangrez’ रेस्टॉरंट होणार कायमचे बंद; 'हे' धक्कादायक कारण आले समोर

लंडनमधील भारतीय खाद्यसंस्कृतीची ओळख बनलेले ‘रंगरेज’ रेस्टॉरंट 16 वर्षांनंतर कायमचे बंद करण्याचा निर्णय मालक हरमन सिंग कपूर यांनी घेतला आहे.

indian restaurant in london 16 वर्षांपासून भारतीय खाद्यसंस्कृतीची ओळख बनलेले ‘rangrez’ रेस्टॉरंट होणार कायमचे बंद हे धक्कादायक कारण आले समोर

लंडनमधील भारतीय खाद्यसंस्कृतीची ओळख बनलेले ‘रंगरेज’ (Rangrez) हे लोकप्रिय रेस्टॉरंट पुढील महिन्यात कायमचे बंद होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. गेली 16 वर्षे भारतीय चवीचा वारसा जपत स्थानिक तसेच भारतीय समुदायामध्ये विशेष लोकप्रिय ठरलेले हे रेस्टॉरंट बंद करण्याचा निर्णय मालक हरमन सिंग कपूर यांनी जाहीर केला आहे. वाढते व्यावसायिक खर्च, सातत्याने निर्माण होणाऱ्या अडचणी आणि सुरक्षेबाबतच्या चिंतेमुळे हा निर्णय घ्यावा लागल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

लंडनमधील हॅमरस्मिथ परिसरात पत्नीसमवेत व्यवसाय चालवणाऱ्या कपूर यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वरून ही माहिती सार्वजनिक केली. दीड दशकाहून अधिक काळ ग्राहकांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत त्यांनी हा निर्णय भावनिकदृष्ट्या कठीण असल्याचे नमूद केले. घोषणेनंतर सोशल मीडियावर ग्राहक आणि स्थानिक नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया उमटल्या असून अनेकांनी रेस्टॉरंट बंद होणे ही दुर्दैवी बाब असल्याची भावना व्यक्त केली आहे. 

कपूर यांनी यापूर्वी स्वतःला आणि कुटुंबीयांना धमक्या मिळाल्याचा आरोपही केला होता. एका सामाजिक-राजकीय विषयावर मत व्यक्त करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर लक्ष्य करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला होता. 2023 मध्ये लंडनस्थित भारतीय उच्चायुक्तालयावरील तोडफोडीनंतर काही दिवसांतच त्यांच्या रेस्टॉरंटवरही कथितरित्या हल्ला झाल्याचे त्यांनी सांगितले होते. या घटनेनंतर सुरक्षेबाबत गंभीर चिंता निर्माण झाल्याचे त्यांनी वारंवार नमूद केले होते.

हेही वाचा: Rajya Sabha Election: महायुती पुन्हा खेळणार जुना डाव? राज्यसभा निवडणुकीआधी भाजपच्या बैठकीत मोठे निर्णय

त्यांच्या म्हणण्यानुसार, कुटुंबाला जीवे मारण्याच्या धमक्या, अपमानास्पद फोन कॉल्स तसेच छळाचा सामना करावा लागला. या धमक्या पाकिस्तानकडून येत असल्याचे त्यांनी सांगितले. काही व्यक्तींनी सोशल मीडियावरील पोस्ट हटवण्याची आणि विशिष्ट घोषणाबाजी करण्याची मागणी केल्याचाही आरोप त्यांनी केला होता. या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून अपेक्षित संरक्षण मिळाले नसल्याची नाराजी त्यांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, यूके पोलिसांनी घटनेनंतर अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिल्याचे, संबंधितांशी संवाद साधल्याचे आणि सीसीटीव्ही तपासणीसह अतिरिक्त सुरक्षा उपाय सुचविल्याचे स्पष्ट केले होते. मात्र आरोपींवर ठोस कारवाई न झाल्याने भीतीचे वातावरण कायम असल्याचा दावा कपूर यांनी केला आहे.

दीर्घकाळ सुरू असलेला तणाव, सुरक्षेच्या समस्या आणि वाढत्या आर्थिक दबावामुळे अखेर 16 वर्षांची यशस्वी व्यावसायिक वाटचाल थांबवण्याची वेळ आल्याचे मानले जात आहे. ‘रंगरेज’ रेस्टॉरंट बंद होण्याच्या निर्णयामुळे लंडनमधील भारतीय समुदायात निराशा व्यक्त होत असून, भारतीय खाद्यसंस्कृतीची ओळख बनलेल्या एका लोकप्रिय ठिकाणाचा अध्याय संपत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा: Lawrence Bishnoi Lawyer: दिल्लीत काश्मीरी गेट परिसरात गोळीबार; गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या वकिलाच्या गाडीवर झाडल्या गोळ्या


सम्बन्धित सामग्री