‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) या राजकीय पक्षाच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना अखेर मोठा दिलासा मिळाला आहे. दिल्लीतील विशेष कार्यकारी दंडाधिकारी (SEM) न्यायालयाने पक्षाचे प्रमुख प्रवक्ते आशुतोष रांका आणि नेते सौरभ दास यांना जामीन मंजूर केला आहे. दिल्ली पोलिसांनी तपासाचे कारण देत या दोन्ही नेत्यांची न्यायालयीन कोठडी आणखी 3 दिवसांनी वाढवून देण्याची विनंती न्यायालयाकडे केली होती. मात्र, न्यायालयाने पोलिसांचा हा अर्ज फेटाळून लावत दोन्ही नेत्यांची अटी व शर्तींसह सुटका करण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत.
तिहार तुरुंगात 7 दिवस घालवल्यानंतर सुटकेचा मार्ग मोकळा
जंतरमंतर परिसरातील प्रतिबंधित क्षेत्रात परवानगीशिवाय प्रवेश केल्याचा आणि शांतता राखण्याच्या बंधपत्राचे उल्लंघन केल्याचा आरोप ठेवत 14 ऑक्टोबर रोजी या दोन्ही नेत्यांना अटक करण्यात आली होती. सुरुवातीला त्यांना 5 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती आणि ते तिहार तुरुंगात होते. त्यानंतर 19 ऑक्टोबर रोजी न्यायालयाने त्यांच्या कोठडीत 2 दिवसांची वाढ केली होती. ही मुदत बुधवारी संपल्याने त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. सलग 7 दिवस तिहार तुरुंगात घालवल्यानंतर अखेर न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केल्याने त्यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला आहे.
हेही वाचा – कोर्टाच्या ‘Gen Z’ टिप्पणीवर अभिजीत दीपकेंचा पलटवार; पंतप्रधान मोदींचा फोटो शेअर करत एका ओळीत साधला निशाणा
उच्च न्यायालयाने हस्तक्षेपास केला होता नकार
तत्पूर्वी, आशुतोष रांका आणि सौरभ दास यांनी आपल्या अटकेविरोधात आणि कोठडीविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, उच्च न्यायालयाने या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करण्यास स्पष्ट नकार दिला होता. एसईएम न्यायालयासमोर होणाऱ्या आगामी सुनावणीची वाट पाहण्याचा सल्ला देत, गरज पडल्यास योग्य त्या अपिलीय न्यायालयात दाद मागण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले होते. अखेर कनिष्ठ SEM न्यायालयानेच पोलिसांची मागणी फेटाळत जामीन मंजूर केल्यामुळे सीजेपी समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.