मुंबई : मध्य रेल्वेची या आर्थिक वर्षात नोव्हेंबर 2024 पर्यंत प्रवासी वाहतूक आणि उत्पन्नात उल्लेखनीय वाढ झाली आहे. 2019-2020 च्या तुलनेत मध्य रेल्वेने प्रवासी भाड्यातून 4,966 कोटी रुपये प्राप्त केले, जे मागील वर्षी याच कालावधीत 4,699 कोटी रुपये होते. यामध्ये 5.68% चा वाढीचा दर नोंदवला गेला आहे.
गैर-उपनगरीय मार्गातून प्राप्त झालेल्या उत्पन्नामध्ये 5.69% वाढ झाली आहे. नोव्हेंबर 2024 पर्यंत 4,328 कोटी रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले, जे मागील वर्षीच्या तुलनेत अधिक आहे. त्याचप्रमाणे, उपनगरीय मार्गातून 638 कोटी रुपये मिळाले, जी मागील वर्षाच्या तुलनेत 5.63% अधिक आहे.
मध्य रेल्वेच्या प्रवासी संख्येत देखील वाढ झाली आहे. मध्य रेल्वेने या आर्थिक वर्षात नोव्हेंबर 2024 पर्यंत 1,064 दशलक्ष प्रवाशांची वाहतूक केली, जी मागील वर्षीच्या 1,039 दशलक्ष प्रवाशांच्या तुलनेत 2.35% अधिक आहे. त्यामध्ये गैर-उपनगरीय प्रवाशांची संख्या 127 दशलक्ष आहे, जी गेल्या वर्षीच्या 121 दशलक्ष प्रवाशांच्या तुलनेत 5.61% ने वाढली आहे. उपनगरीय प्रवाशांच्या संख्येतही 936 दशलक्ष प्रवासी असून, मागील वर्षी याच कालावधीत 918 दशलक्ष प्रवाशी होते.
नोव्हेंबर 2024 मध्ये मध्य रेल्वेने एकाच महिन्यात 138 दशलक्ष प्रवाशांची वाहतूक केली आणि 554 कोटी रुपयांचा महसूल मिळवला. यामध्ये 84 कोटी रुपये उपनगरीय उत्पन्न आणि 470 कोटी रुपये गैर-उपनगरीय उत्पन्नाच्या स्वरूपात मिळाले.