‘विमानात बॉम्ब…’; कोलकाता विमानतळावर खळबळ, फुकेतवरून आलेल्या विमानाच्या टॉयलेटमध्ये आरशावर सापडला धमकीचा संदेश

थायलंडमधील फुकेत शहरातून कोलकाता येथे दाखल झालेल्या एका प्रवाशी विमानाच्या प्रसाधनगृहातील आरशावर "विमानात बॉम्ब आहे" असा संदेश लिहिलेला आढळला.
‘विमानात बॉम्ब…’; कोलकाता विमानतळावर खळबळ,  फुकेतवरून आलेल्या विमानाच्या टॉयलेटमध्ये आरशावर सापडला धमकीचा संदेश
bomb threat Phuket flight

पश्चिम बंगालमधील कोलकाता येथील ‘नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळावर’ पुन्हा एकदा बॉम्बच्या धमकीमुळे मोठी खळबळ उडाली आहे. थायलंडमधील फुकेत शहरातून कोलकाता येथे दाखल झालेल्या एका प्रवाशी विमानाच्या प्रसाधनगृहातील आरशावर “विमानात बॉम्ब आहे” असा संदेश लिहिलेला आढळला. विमान धावपट्टीवर उतरल्यानंतर केबिन क्रूचे सदस्य जेव्हा नियमित स्वच्छतेसाठी आत गेले, तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. या धक्कादायक घटनेमुळे विमानतळ प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणांची एकाच पळापळ झाली.

विमान सुरक्षित स्थळी हलवले

प्रसाधनगृहातील हा संशयास्पद संदेश दिसताच केबिन क्रूने तत्काळ विमानाचे वैमानिक आणि विमानतळ सुरक्षा दलाला (CISF) याची कल्पना दिली. सुरक्षेचा उपाय म्हणून संपूर्ण विमानाला तातडीने मुख्य धावपट्टीवरून हटवून एका सुरक्षित ‘आयसोलेशन बे’ (Isolation Bay) मध्ये नेण्यात आले. तेथे सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर उतरवून त्यांच्या सामानाची तपासणी करण्यात आली. त्यानंतर ‘सीआयएसएफ’, बॉम्ब शोधक व नाशक पथक तसेच स्थानिक पोलिसांनी विमानाचा कोपरा न् कोपरा छानून काढला. सुदैवाने, संपूर्ण तपासणीनंतर विमानात कोणतीही स्फोटके किंवा संशयास्पद वस्तू आढळली नाही.

हेही वाचा – बिल्डरच्या मुलाचा प्रताप; आलिशान कारने 5 वाहनांना उडवलं, 2 जणांचा मृत्यू, 3 गंभीर जखमी

प्रवाशांची यादी आणि सीसीटीव्ही फुटेजचा तपास

प्राथमिक तपासानुसार केवळ घबराट पसरवणे आणि सुरक्षा यंत्रणांना त्रास देणे या उद्देशानेच कोणीतरी हे कृत्य केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. विमानतळ पोलीस सध्या विमानातील प्रवाशांची संपूर्ण यादी आणि फुकेत व कोलकाता विमानतळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत, जेणेकरून आरशावर हा संदेश लिहिणाऱ्या व्यक्तीची ओळख पटवता येईल. यापूर्वीही 8 ऑक्टोबर रोजी ईमेलद्वारे कोलकाता विमानतळ उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती. तसेच 5 सप्टेंबर रोजीही एका विमानात अशीच धमकीची चिठ्ठी सापडली होती. विमान वाहतुकीत बाधा निर्माण करणाऱ्या अशा अफवाखोरांवर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version