Saturday, March 07, 2026 03:06:49 AM

भारतातील असे एकमेव राज्य जिथे जात नाही रेल्वे; निसर्गाचं नंदनवन असलेलं हे कोणतं राज्य आहे, ठाऊक आहे का?

येथील ओबडधोबड, उंचसखल भूप्रदेश, डोंगरदऱ्या आणि संवेदनशील भौगोलिक ठिकाण असल्यामुळे रेल्वे मार्ग तयार करणे हे इंजिनिअर्ससाठी मोठे आव्हान राहिले आहे.

भारतातील असे एकमेव राज्य जिथे जात नाही रेल्वे  निसर्गाचं नंदनवन असलेलं हे कोणतं राज्य आहे ठाऊक आहे का

Only State Without Railway Station: भारतीय रेल्वे हे देशातील सर्वात मोठे वाहतूक जाळे मानले जाते, जे काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत पसरलेले आहे. मात्र, तुम्हाला माहीत आहे का, की भारतात अजूनही असे एक राज्य आहे जिथे एकही रेल्वे स्टेशन नाही? हिमालयीन पर्वतरांगांमध्ये वसलेले आणि निसर्गप्रेमींसाठी नंदनवन असलेले हे देशातील एकमेव असे राज्य आहे, जे अजूनही भारतीय रेल्वेच्या नकाशावर आलेले नाही. मात्र, आता हे चित्र लवकरच बदलणार आहे.

सिक्किममध्ये रेल्वे नसण्यामागची कारणे आणि आव्हाने
सिक्किममध्ये आजवर रेल्वे न पोहोचण्यामागे भौगोलिक आव्हाने हे सर्वात मोठे कारण आहे. येथील ओबडधोबड, उंचसखल भूप्रदेश, डोंगरदऱ्या आणि संवेदनशील भौगोलिक ठिकाण असल्यामुळे रेल्वे मार्ग तयार करणे हे इंजिनिअर्ससाठी मोठे आव्हान राहिले आहे. हा भाग भूस्खलन (Landslides) आणि भूकंपप्रवण क्षेत्राच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील असल्याने इथे पारंपरिक रेल्वे मार्ग बांधणे व्यावहारिकदृष्ट्या कठीण होते. म्हणूनच, स्वातंत्र्याला इतकी वर्षे उलटूनही हे राज्य रेल्वे नेटवर्कपासून अलिप्त राहिले.

हेही वाचा - Indian Railway : ना न्यूयॉर्क, ना टोकियो; ''या'' भारतीय रेल्वे जंक्शनची कनेक्टिव्हिटी जगात भारी! 7 दिशांना धावतात ट्रेन

पंतप्रधान मोदींनी घातली पायाभरणी
सिक्किमला मुख्य प्रवाहातील रेल्वे नेटवर्कशी जोडण्यासाठी केंद्र सरकारने आता कंबर कसली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फेब्रुवारी 2024 मध्ये सिक्किमच्या पहिल्या रेल्वे स्टेशनची म्हणजे 'रंगपो' (Rangpo) रेल्वे स्टेशनची पायाभरणी केली. हा प्रकल्प पश्चिम बंगालमधील सेवोक (Sevoke) ते सिक्किममधील रंगपो यांना जोडणारा 44.96 किमी लांबीचा मार्ग आहे. या प्रकल्पामुळे सिक्किमचे रेल्वे कनेक्टिव्हिटीचे स्वप्न आता सत्यात उतरत आहे. एकदा का सिक्किम रेल्वेने जोडले गेले, की येथील पर्यटन क्षेत्राला मोठी चालना मिळेल. तासन्तास चालणारा रस्त्याचा प्रवास आता काही मिनिटांवर येईल.

सेवोक-रंगपो रेल्वे प्रकल्पाची सद्यस्थिती
हा प्रकल्प केवळ पर्यटनासाठीच नाही तर सामरिकदृष्ट्याही अत्यंत महत्त्वाचा आहे. या मार्गावर एकूण 14 बोगदे (Tunnels) आणि 22 पूल बांधले जात आहेत. फेब्रुवारी 2026 मधील ताज्या अहवालानुसार, या प्रकल्पाचे सुमारे 85 ते 90 टक्के काम पूर्ण झाले आहे. भारतीय रेल्वेने हा प्रकल्प डिसेंबर 2027 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यात 'तीस्ता बाजार' नावाचे भारतातील पहिले भुयारी (Underground) स्टेशन देखील समाविष्ट आहे, जे या प्रकल्पाचे मुख्य आकर्षण असेल. एवढेच नाही तर, सिक्किमची राजधानी गंगटोकलाही रेल्वेने जोडण्याच्या दुसऱ्या टप्प्याचे नियोजन सुरू आहे. यामुळे स्थानिक लोकांच्या प्रवासाचा प्रश्न सुटेल आणि लष्करी दृष्टिकोनातून चीन सीमेपर्यंत रसद पोहोचवणे देखील सोपे होईल. थोडक्यात, सिक्किमचा 'नो रेल्वे स्टेशन' हा टॅग आता लवकरच पुसला जाणार आहे.

हेही वाचा - Namo Bharat Train Inauguration: ताशी 180 किमी वेग आणि बुलेट ट्रेनसारख्या सुविधा; पंतप्रधान मोदींच्या हस्ते दिल्ली-मेरठ RRTS मार्ग आणि मेरठ मेट्रोचे उद्घाटन


सम्बन्धित सामग्री