नवी दिल्ली: आज नवी दिल्लीतील कर्तव्यपथावर प्रजासत्ताक दिनाच्या भव्य संचलनात इतिहास घडला आहे. जम्मू-काश्मीरमधील 26 वर्षीय सिमरन बाला या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (CRPF) सहाय्यक कमांडंट म्हणून 140 हून अधिक पुरुष जवानांच्या तुकडीचे त्यांनी नेतृत्व केले आहे. प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात प्रथमच एखादी महिला अधिकारी इतक्या मोठ्या पुरुष तुकडीची जबाबदारी सांभाळणार असल्याने हा क्षण विशेष ठरला आहे.
सिमरन बाला या जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातील रहिवासी असून, त्या या जिल्ह्यातून CRPF मध्ये अधिकारी म्हणून भरती होणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या आहेत. सुमारे 3 लाख 25 हजार जवान असलेले CRPF हे देशातील सर्वात मोठे सैनिक दल असून, ते देशांतर्गत सुरक्षेची जबाबदारी सांभाळते. नक्षलविरोधी कारवाया, जम्मू-काश्मीरमधील दहशतवादविरोधी मोहिमा आणि ईशान्य भारतातील भाग ही या दलाची प्रमुख कार्यक्षेत्रे आहेत.
शैक्षणिक वाटचालीबद्दल सांगायचे झाल्यास, सिमरन बाला यांनी जम्मू येथील गांधी नगरमधील शासकीय महिला महाविद्यालयातून राज्यशास्त्र विषयात पदवी घेतली आहे. त्यांनी 2025 मध्ये UPSC द्वारे घेण्यात येणारी CAPF सहाय्यक कमांडंट परीक्षा उत्तीर्ण होत CRPF मध्ये पद मिळवले. त्यांची पहिली नियुक्ती छत्तीसगडमधील ‘बस्तरिया’ बटालियनमध्ये झाली, जिथे त्यांना नक्षलविरोधी मोहिमांचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला.
हेही वाचा: Padma Awards: पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री यामध्ये काय आहे फरक? जाणून घ्या पुरस्कारांची पूर्ण माहिती
CRPF अकादमी, गुरुग्राम येथे प्रशिक्षण घेत असताना सिमरन बाला यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. प्रशिक्षण काळात उत्कृष्ट प्रशिक्षण आणि प्रभावी सार्वजनिक भाषणासाठी त्यांना विशेष पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या नेतृत्वगुणांची दखल घेत आज त्यांच्यावर प्रजासत्ताक दिन संचलनातील ही महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
दरम्यान, यंदाच्या प्रजासत्ताक दिन संचलनात महिलांचा सहभाग आणखी आकर्षक ठरले आहे. CRPF आणि सशस्त्र सीमा बलाच्या महिला जवानांची संयुक्त ‘डेअर डेव्हिल्स’ पथक रॉयल एनफिल्ड बुलेट मोटारसायकलवरून थरारक प्रात्यक्षिक सादर केले आहे. याआधी 2020 मध्येही या महिला जवानांनी आपल्या साहसाने संपूर्ण देशाचे लक्ष वेधले होते.
एकूणच, सिमरन बाला यांचे नेतृत्व आणि महिला जवानांचा वाढता सहभाग हे भारतीय सुरक्षा दलांतील महिलांच्या सक्षम भूमिकेचे आणि बदलत्या भारताचे प्रतीक मानले जात आहे.
हेही वाचा: Pune Railway Time Table: रेल्वेप्रवास करणाऱ्यांसाठी 'बॅड न्यूज'; 'या' रेल्वेगाड्या आता हडपसर स्टेशनलाच थांबणार कारण काय?