Kerala Sky Dining Incident: केरळच्या इडुक्की जिल्ह्यात पर्यटकांसाठी सुरू करण्यात आलेल्या स्काय-डायनिंग सुविधेत मोठी दुर्घटना टळली. अनाचल परिसरातील या खाजगी स्काय-डायनिंग सेंटरमध्ये शुक्रवार दुपारी तांत्रिक बिघाड झाल्याने तब्बल 120 फूट उंचीवर असलेले पर्यटक अडकून पडले. जवळपास दीड तास हा थरार सुरू राहिल्यानंतर बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली आणि बचाव मोहिमेला सुरुवात झाली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला आहे.
हेही वाचा - शाब्बास नवरोबा! औक्षणाच्या ताटात हुंड्याचे 31 लाख रुपये, नवरामुलगा म्हणाला, 'अहो, मला तर फक्त इतकेच...'
मुन्नारजवळ पर्यटकांना साहसी अनुभव देण्यासाठी ही स्काय-डायनिंग सुविधा काही महिन्यांपूर्वीच सुरू करण्यात आली होती. एका वेळेस 16 पर्यटकांना या प्लॅटफॉर्मवर बसवून दरीच्या वर उंचावर जेवण्याचा अनोखा अनुभव दिला जातो. डायनिंग प्लॅटफॉर्म विशेष क्रेनने हवेत उचलला जातो आणि सुमारे अर्धा तास विहंगम दृश्यांसह भोजनाचा आनंद घेता येतो. मात्र, शुक्रवारी अचानक क्रेनच्या फ्यूजमध्ये बिघाड निर्माण झाला. परिणामी प्लॅटफॉर्म खाली आणणे शक्य झाले नाही आणि पर्यटक हवेतच अडकले. यानंतर ताबडतोब बचाव पथकांना पाचारण करण्यात आले.
हेही वाचा - Cyclone Ditwah Alert : 'दितवाह' चक्रीवादळामुळे श्रीलंकेला मोठा फटका, मृतांची संख्या 56 वर, तामिळनाडू-आंध्रप्रदेशला सतर्कतेचा इशारा
सध्या मुन्नार येथून आलेले अग्निशमन दलाचे कर्मचारी आणि सुरक्षा पथके बचावाचे पर्याय शोधत आहेत. दोरींच्या साहाय्याने पर्यटकांना सुरक्षितपणे खाली उतरवण्याची तयारी सुरू आहे. त्याचबरोबर अभियंते क्रेनची यंत्रणा पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न करत आहेत. प्रशासनाच्या माहितीनुसार, सर्व पर्यटक सुरक्षित आहेत आणि परिस्थिती नियंत्रणात आहे. सुटकाकार्य सुरू असून लवकरच सर्वांना सुरक्षितपणे खाली आणले जाईल, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. या प्रकारामुळे साहसी पर्यटनातील सुरक्षा उपायांबाबत प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.