Friday, June 12, 2026 11:32:20 PM

Thalapathy Vijay: थलपती विजय यांनी आईच्या प्रेमापोटी चेन्नईत उभारलं भव्य साई मंदिर; चाहत्यांमध्ये चर्चा

तामिळनाडूचे नवे मुख्यमंत्री आणि सुपरस्टार थलापती विजयने आपली आई शोभा चंद्रशेखर यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी चेन्नईमध्ये एक भव्य 'शिर्डी साई बाबा मंदिर' उभारले आहे.

thalapathy vijay थलपती विजय यांनी आईच्या प्रेमापोटी चेन्नईत उभारलं भव्य साई मंदिर चाहत्यांमध्ये चर्चा

मदर्स डे किंवा आईबद्दलच्या आठवणी जेव्हा निघतात, तेव्हा सिनेसृष्टीतील अनेक भावूक किस्से समोर येतात. असाच एक काळजाला भिडणारा किस्सा दक्षिण भारतीय सुपरस्टार आणि आता तामिळनाडूच्या राजकारणात सक्रिय झालेल्या थलपती विजय यांचा आहे. आपल्या व्यस्त अभिनय कारकीर्दीत आणि राजकीय प्रवासाची आखणी करताना, विजय यांनी अत्यंत शांतपणे त्यांच्या आई शोभा चंद्रशेखर यांची एक मोठी इच्छा पूर्ण केली होती. विजय यांनी त्यांच्या आईसाठी चेन्नईमध्ये एक भव्य 'शिर्डी साई बाबा मंदिर' उभारले आहे, ज्याची चर्चा आता पुन्हा एकदा चाहत्यांमध्ये रंगली आहे.

आईची भक्ती आणि विजयची कृती

विजय यांच्या आई शोभा चंद्रशेखर या साई बाबांच्या निस्सीम भक्त आहेत. वयोमानानुसार त्यांना वारंवार शिर्डीला जाणे शक्य होत नसे. त्यांच्या आईची ही अडचण आणि त्यांची मनापासून असलेली इच्छा ओळखून, विजय यांनी आईच्या भक्तीचा आदर करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी चेन्नईच्या कोरात्तूर (Korattur) परिसरातील वेंकटेश्वर नगरजवळ हे भव्य मंदिर उभारले. फेब्रुवारी 2024 मध्ये या मंदिराचा कुंभाभिषेक सोहळा अत्यंत साधेपणाने पार पडला, ज्याला केवळ कुटुंबातील सदस्य आणि जवळचे मित्र उपस्थित होते.

स्वप्नपूर्तीचा तो भावनिक क्षण

या सोहळ्यादरम्यान शोभा चंद्रशेखर अत्यंत भावूक झाल्या होत्या. "आमच्या स्वतःच्या परिसरात साई बाबांचे एक मंदिर असावे, असे माझे अनेक वर्षांपासूनचे स्वप्न होते. विजयने माझे हे स्वप्न पूर्ण केले," अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या. विशेष म्हणजे, विजय यांनी हे काम कोणत्याही प्रसिद्धीशिवाय किंवा गाजावाजा न करता पूर्ण केले. आजही शोभा चंद्रशेखर दर गुरुवारी या मंदिरात जाऊन साई बाबांचे दर्शन आणि प्रार्थना करतात.

हेही वाचा: Vijay Thalapathy Oath Ceremony: विजय यांच्या शपथविधीला अभिनेत्री तृषा कृष्णनची विशेष हजेरी; 'या' एका प्रतिक्रियेने वेधले सर्वांचे लक्ष

सर्वधर्मीय आदर आणि अध्यात्मिक बाजू

विजय यांचे कुटुंब ख्रिश्चन धर्मीय असले, तरी त्याने नेहमीच सर्व धर्मांचा सारखाच सन्मान केला आहे. टे स्वतः देखील अनेक वर्षांपासून शिर्डी साई बाबांच्या दर्शनाला नियमितपणे जात आहेत. सुरुवातीला हे मंदिर त्यांच्या कौटुंबिक मालकीच्या थिएटरच्या जागेजवळ बांधण्याचे नियोजन होते, परंतु तिथे मेट्रो रेल्वेचे काम सुरू झाल्यामुळे हा प्रकल्प कोरात्तूर येथील मोठ्या जागेत हलवण्यात आला. आपल्या आईला घराच्या जवळच शांत आणि अध्यात्मिक वातावरण मिळावे, हाच त्यामागचा मुख्य उद्देश होता.

स्टारडम पलीकडचा 'माणूस' विजय

सध्या विजय राजकारणात त्यांचा प्रभाव पाडत असताना आणि त्यांचे आगामी चित्रपट चर्चेत असताना, ही जुनी घटना पुन्हा एकदा व्हायरल होत आहे. पडद्यावर दमदार भूमिका साकारणारे आणि मंचावर आक्रमक भाषणे देणारे थलपती विजय वैयक्तिक आयुष्यात किती संवेदनशील आहेत, याची ही साक्ष आहे. हे मंदिर केवळ एक वास्तू नसून, एका मुलाने आपल्या आईप्रती व्यक्त केलेले प्रेम आणि आदराचे प्रतीक आहे.

विजय यांच्या या कृतीने त्यांच्या चाहत्यांमध्ये त्याच्याबद्दलचा आदर आणखी वाढवला आहे. "एवढा मोठा सुपरस्टार असूनही तो आपल्या मुळांशी आणि आईच्या इच्छेशी किती घट्ट जोडलेला आहे," अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहेत. राजकारणातील यशानंतरही विजयची ही कौटुंबिक आणि भावनिक बाजू त्यांना इतर नेत्यांपेक्षा वेगळे ठरवत असल्याचे चित्र सध्या तामिळनाडूमध्ये पाहायला मिळत आहे. 

हेही वाचा: Cabinet Minister Dies: 4 वेळा आमदार, समाजकल्याण मंत्री ते नियोजन मंत्री पदावर असलेले कॅबिनेट मंत्र्यांचे निधन; मंत्रिमंडळावर शोककळा

 


सम्बन्धित सामग्री